Sangli Ganeshotsav: 250 वर्षांची परंपरा अन् लाखो भक्तांची श्रद्धा, सांगलीच्या रथोत्सवाचं मराठ्यांशी आहे ऐतिहासिक कनेक्शन
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Sangli Ganeshotsav: तासगावचा रथोत्सव महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील गणेश भक्तांच्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.
सांगली: सांगलीच्या तासगाव शहराचा सांस्कृतिक ठेवा म्हणून 'श्री सिद्धिविनायक मंदिर' प्रसिद्ध आहे. वास्तुकलेचा अत्यंत देखणा नमुना असलेल्या मंदिराला भाद्रपद पंचमी रथोत्सवाची सुरेख परंपरा लाभली आहे. तासगावचा रथोत्सव महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील गणेश भक्तांच्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. जवळपास अडीचशे वर्षांची परंपरा लाभलेला तासगावचा रथोत्सव नेमका कोणी सुरू केला, हे लोकल 18ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत पेशव्यांचे शूर सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांचे सातवे वंशज राजेंद्र पटवर्धन यांच्या अधिक माहिती दिली.
थोरले माधवराव पेशवे यांनी 1771 मध्ये मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांची मिरज प्रांत, कसबे तासगाव येथे सरदार म्हणून नमणूक केली. परशुरामभाऊ हे गणपती पुळ्याच्या श्री गणपतीचे भक्त होते. कोणत्याही मोहिमेला जाण्याआधी दर्शन घेऊनच लढाईवर जात असल्याचं सांगितलं जाते. तासगाव येथे स्थायिक झाल्यावर त्यांना 'श्रीं'चा दृष्टांत झाला. त्यामुळे त्यांनी तासगाव येथेच 1771 मध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर बांधलं.
advertisement
मंदिराची उभारणी 1771मध्ये सुरू झाली आणि 1779 मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. त्याच वर्षी फाल्गुन शुद्ध द्वितीया शके 1701 रोजी या मंदिरात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली. हे मंदिर स्थापत्य कलेचा सुंदर नमुना आहे. पुण्यातील पर्वती येथील देव देवेश्वर मंदिराच्या धर्तीवर हे सिद्धिविनायकाचं मंदिर बांधण्यात आलं आहे. मंदिरात केंद्रस्थानी सिद्धिविनायक आहे तर चारी बाजूला विष्णू, महादेव, सूर्य आणि उमादेवी यांच्या मूर्ती आहे. हे पंचायतन महाराष्ट्रासह कर्नाटकातील गणेशभक्तांचं श्रद्धास्थान आहे.
advertisement
1779ला पहिला रत्थोत्सव
परशुराम भाऊंची श्री गणेशावर अफाट भक्ती होती. त्यांनी तासगावमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर बांधलं. श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी कर्नाटकात श्रीरंगपट्टण येथे पाहिलेल्या रथोत्सवाची कल्पना तासगाव येथे प्रथमच 1779 मध्ये सुरू केली. तेव्हापासूनच तासगावची भरभराट सुरू झाल्याचं म्हटलं जातं. रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी गणेशभक्तांची भावना असते. म्हणूनच भाविक रथावर मोठ्या भक्तीभावाने पेढे, नारळ, गुलाल, खोबऱ्याची उधळण करत दोरखंडाच्या सहाय्याने रथ ओढत नेतात. या रथामध्ये संस्थानची पंचधातूची सिद्धिविनायकाची मूर्ती असते. श्रींचा रथ गुरूवार पेठेतील काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत ओढला जातो. भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी दुपारी बरोबर एक वाजता या रथोत्सवास सुरुवात होते. या रथासमोर गणपती संस्थानचा हत्ती दिमाखात चालत असतो.
advertisement
काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथोत्सव
तरुण पिढी मानवी मनोरे उभारुन आनंद लुटते. ढोल, लेझिम पथके रथासमोर भक्तीभावाने आपलं सादरीकरण करत असतात. काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ आल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीची आरती केली जाते. या ठिकाणी कापूर ओढ्यात मूर्तीचं विसर्जन केलं जातं, असा भाविकांचा समज आहे. मात्र, मूर्तीचे विसर्जन होत नसल्याची माहिती राजेंद्र पटवर्धन यांनी लोकल18शी बोलताना दिली. तसेच कापूर ओढ्यापासून रथ पुन्हा गणपती मंदिराकडे परतीच्या प्रवासास निघतो. रथ परत गणपतीच्या मंदिरापर्यंत ओढला जातो व रथोत्सव संपतो. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक मोठ्या श्रध्देने या रथोत्सवात सहभागी होतात.
advertisement
कोण होते परशुरामभाऊ पटवर्धन?
1740 ते 1799 पर्यंत परशुराम भाऊ पटवर्धनांनी मराठा साम्राज्यासाठी लढा दिला. तत्कालीन ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेलस्की यांनी भाऊंबद्दल 'सर्वात विश्वासू मराठा सरदार' असे उद्गार काढले होते. 59 वर्षांत जवळजवळ सर्वच कमावत्या लोकांनी साम्राज्यासाठी आपले प्राण दिले. रामचंद्र पटवर्धन यांचे पुत्र परशुरामभाऊ पटवर्धन हे एक थोर पुरुष होते. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचं संगोपन त्यांच्या आई आणि काका गोविंदराव यांनी केलं.
advertisement
शंभर लढायांमध्ये सेनापती म्हणून योगदान
युद्धभूमीवर त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी श्रीरंगपट्टम येथे पहिली लढाई खेळली. वयाच्या 59 व्या वर्षापर्यंत प्रत्येक लढाईत ते फक्त मराठा साम्राज्यासाठी लढले. सिंदखेडचा निजाम, रत्तेहल्ली येथील हैदर, पहिले मराठा-ब्रिटिश युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मराठी ब्रिटिश युद्धात त्यांनी जनरलचा पाठलाग केला. टिपू सुलतानने नरगुंड येथे वेढा घातला होता. परशुराम भाऊ तो वेढा उलथवून टाकण्यात यशस्वी झाले. त्यांनी धारवाडचा किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ल्यावर मराठा ध्वज फडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीरंगपट्टमनंतर, 1795 मध्ये निजामाविरुद्ध खर्डे येथे झालेलं युद्ध त्यांच्या आयुष्यातील मोठं आव्हान होतं. या लढाईतील यशाचं श्रेय परशुराम भाऊंना जातं.
advertisement
जानेवारी 1761 मध्ये पानिपतच्या युद्धानंतर, असं मानलं जात होतं की मराठ्यांची सत्ता कमी झाली आहे. सिंदखेडच्या निजामाने खंडणी न देता खळबळ उडवून दिली. त्याला 25 लाखांची रक्कम द्यायची होती जी फारशी मोठी रक्कम नव्हती. त्यानंतर परशुराम भाऊंनी निजामाकडून दौलताबादचा किल्ला जिंकला. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्युनंतर माधवराव पेशवे बनले. ते अद्याप अल्पवयीन असल्याने त्यांचे काका राघोबा दादांनी साम्राज्याचं कामकाज हाती घेतलं होतं. त्यांच्या कारभारावर कोणीही खूश नव्हते. माधवराव एक कुशल सेनापती आणि प्रशासक होते आणि त्यांनी लवकरच नियंत्रण हाती घेतले. यामुळे दोघांमध्ये दरी निर्माण झाली. राघोबा दादांच्या कारस्थानांना कंटाळून आणि कोणताही मार्ग न सापडल्याने परशुराम भाऊंनी माधवरावांची बाजू घेतली. राघोबांनी परशुराम भाऊंची सर्व मालमत्ता जप्त केली. तेव्हा परशुराम भाऊंना निजामाकडे आश्रय घ्यावा लागला होता.
1763 मध्ये माधरावांचे मराठे आणि निजाम यांच्यात राक्षसभुवन येथे एक मोठी लढाई झाली. पेशव्यांनी निजामाचा पराभव केला आणि परशुराम भाऊंसह निजामाच्या अधीन झालेल्या इतर सर्व सरदारांना मुक्त केलं. त्यानंतरच्या अनेक युद्धांमध्ये परशुराम भाऊंनी महत्त्वाची भूमिका बजावली. सांगली आणि मिरजजवळील तासगाव हे परशुराम भाऊंचं निवासस्थान होतं. त्यांच्याकडे 122 सैन्य आणि शस्त्रे होती. ते मिरज संस्थानचे फक्त 1/3 भागधारक होते. त्यामुळे मिरजकर पटवर्धनांच्या अंतर्गत, तासगाव राजवाडा आणि आजूबाजूचा प्रदेश त्यांचा वैयक्तिक प्रांत बनला. हे ठिकाण काशे तासगाव म्हणून ओळखलं जाऊ लागले. 1650 ते 1770 दरम्यान या रियासतीबद्दल फारशी माहिती नव्हती. भाऊंनी राज्य हाती घेतल्यानंतरच तासगावला महत्त्व प्राप्त झालं.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
August 28, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli Ganeshotsav: 250 वर्षांची परंपरा अन् लाखो भक्तांची श्रद्धा, सांगलीच्या रथोत्सवाचं मराठ्यांशी आहे ऐतिहासिक कनेक्शन