दुष्काळात सुरू केली गोशाळा, जालन्यातील कुटुंबाची अनोखी गोसेवा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सन 2012 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये दिलीप राठी यांनी गोसेवा धाम सुरू केले.
जालना, 7 नोव्हेंबर: गाईपासून आपल्याला दूध तर मिळते त्याचबरोबर गाय हा एक उपयुक्त पशु देखील आहे. हिंदू धर्मामध्ये गाईचे महत्व अधोरेखित करण्यात आल आहे. त्यामुळेच गाईची या ना त्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत असतात. जालना शहरातील राठी परिवार मागील दहा वर्षांपासून वृंदावन गोसेवा धामच्या माध्यमातून तब्बल 300 गाईंची निस्वार्थ सेवा करत आहे. त्यांचा यामागे उद्देश काय आहे ? आणि या गोसेवा धामचं काम कसं चालतं? याबाबत जाणून घेऊया.
कशी झाली सुरुवात?
सन 2012 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये दिलीप राठी यांना गोसेवा धाम सुरू करण्याची कल्पना सुचली. राठी यांच्या वडिलांना मोठमोठ्या कथा आयोजित करण्याची आवड होती. मात्र वडिलांचा हा छंद दिलीप राठी यांना आवडत नसे. या ऐवजी विधायक काहीतरी काम करावे असा विचार त्यांच्या मनात सतत घोळायचा. यावरच त्यांनी काम करायचे ठरवले. योगायोगाने 2012 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये जनावरांची हाल होऊ लागले. तेव्हा त्यांनी आपल्या संकल्पाला मूर्त रूप दिले. 25 गाईंपासून त्यांनी वृंदावन गोसेवा धाम या गोशाळेची स्थापना केली.
advertisement
गोवंश संवर्धनाचं मोठं काम
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी या गाईंची व्यापाऱ्यापेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी केली. आतापर्यंत या आश्रमाने कोणतीही शासकीय देणगी स्वीकारलेली नाही हे विशेष. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सगळे गोवंश हे देशी प्रजातीचे आहेत. देशी प्रजातीचे संरक्षण व्हावं व भाकड गाई कत्तलखान्यात जाण्यापासून रोखाव्या हाच या गो शाळेचा उद्देश असल्याचे दिलीप राठी सांगतात.
advertisement
325 गाईंचं संगोपन
या गोसेवाधाममध्ये 100 गीर तर 225 च्या आसपास देशी गोवंश आहेत. सकाळी साडेपाच वाजल्यापासून गोशाळेचे काम सुरू होते. शाळेतील गाईंची निगा राखण्यासाठी पाच कुटुंबांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या देशी गाईंना चारण्यासाठी जवळपास दोनशे एकर जमीन राठी यांनी राखून ठेवली आहे. दररोज 25 हजारांचा खर्च या 325 गायींवर केला जातो. यातून पाच ते सात हजारांचे उत्पन्न त्यांना मिळते. गाईंनी स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणजेच गाईंचा खर्च गाईंनीच काढावा अशी राठी यांची संकल्पना आहे. यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी ठरल्याचे दिलीप राठी सांगतात. जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहीर खोदण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात झालेल्या कमी पावसामुळे पाणी तसेच चाऱ्याची चिंता सतावत असल्याने पुढील काही महिने आव्हानात्मक असतील, असं राठी यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 07, 2023 6:58 PM IST