आईने दागिने गहाण ठेवून पाठवले पैसे, मेंढपाळाच्या मुलीने मिळवली वर्दी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मेंढपाळाच्या मुलीनं मोठ्या जिद्दीनं आई-वडिलांचं स्वप्न साकार केलंय. सघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
जालना, 4 नोव्हेंबर: मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर खडतर परिस्थितीवर मात करत मोठ्या यशाला गवसणी घालता येते. जालना येथील मेंढपाळाच्या मुलीनं आपल्या कर्तृत्वानं हेच सिद्ध केलंय. अर्चना डोळझाके ही भारतीय नौदलात दाखल झाली आहे. आईनं दागिने गहाण टाकून मुलीला पैसे पाठवले अन् अर्चनानं आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
अर्चनाचा संघर्षमय प्रवास
अर्चना जालना जिल्ह्यातील वूटवर या गावची रहिवासी आहे. आई-वडिलांकडे केवळ अडीच एकर शेत जमीन असून ते पारंपारिक मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांना एकूण पाच मुली त्यापैकी अर्चना सर्वात लहान. मोठ्या असलेल्या चारही बहिणीचं कमी वयातच लग्न झालं. त्यामुळे त्या पुढे शिकू शकल्या नाहीत. मात्र अर्चनाने खूप शिकावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती. चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण उटवद येथील प्राथमिक शाळेत झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला पुढील शिक्षणासाठी आळंदी येथे पाठवलं. इथे आध्यात्मिक ज्ञानाचे धडे गिरवतानाच अर्चनाला आर्मी विषयी प्रेम निर्माण झालं. मोबाईल वरती इंटरनेटवर माहिती मिळवून तिने संभाजीनगर मधील एका अकॅडमीत प्रवेश घेतला. इथूनच अर्चनाच्या संघर्षमय प्रवासाची सुरुवात झाली.
advertisement
अखेर वर्दी मिळवलीच
छत्रपती संभाजीनगर येथे राहत असताना महिन्याला आठ हजारांचा खर्च तिला यायचा. मेंढी पालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या आई-वडिलांना या खर्चाचे दर महिन्याला टेन्शन असायचं. मात्र तडजोड करून त्यांनी पैसे पुरविण्यात कुठेही कमतरता भासू दिली नाही. अर्चनाला देखील तिच्या आई-वडिलांची तसेच परिस्थितीची जाणीव असल्याने तिने देखील कसून सराव केला. तसेच अभ्यासात देखील मन लावले. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तिने अखेर वर्दी मिळवलीच. आई-वडिलांचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते.
advertisement
कष्टाचं चीज झालं
अत्यंत नाजूक परिस्थिती असूनही आई-वडिलांनी मला कुठेही अडचण येऊ दिली नाही तसेच शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळेच मी हा टप्पा गाठू शकले. तसेच या पुढील टप्प्यासाठी देखील आई-वडिलांचा सतत पाठिंबाच असेल असं अर्चना डोळझाक यांनी सांगितलं. अर्चनाच्या यशाबद्दल बोलताना त्यांच्या आई-वडिलांचे डोळे पाणावतात. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचा चीज झालं अशा भावना तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 04, 2023 2:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
आईने दागिने गहाण ठेवून पाठवले पैसे, मेंढपाळाच्या मुलीने मिळवली वर्दी, Video