सैलानी बाबा यात्रा, भाविकांसाठी ‘एसटी’चा मोठा निर्णय, जालन्यातून 115 बस
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sailani Baba Yatra: सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सैलानी बाबा यात्रेला होळीपासून सुरुवात होतेय. जालना जिल्ह्यातून या यात्रेसाठी 115 अतिरिक्त बस चालवण्यात येणार आहेत.
जालना: सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रेला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे सुरुवात होत आहे. होळीच्या दिवसापासून नारळाची होळी पेटवून या ठिकाणी सैलानी बाबा यात्रेचा उत्सव सुरू होतो. या उत्सवाला महाराष्ट्रभरातून लोक येतात. सैलानी बाबांच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाने देखील जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जालना विभागामार्फत सैलानी यात्रेकरिता बसचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
प्रवासी भाविकांना प्रवासादरम्यान कुठल्याही संकटाचा सामना करावा लागू, नये यासाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरातून थेट सैलानी यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेकरिता 115 जादा बसचे नियोजन केले आहे. बाहेरील विभागाच्या देखील एकूण 40 बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देण्यात येत असून, एकूण 115 बसद्वारे सैलानी यात्रेकरिता प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. जालना एसटी विभागाकडून करण्यात आलेल्या जादा बसच्या नियोजनास प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार व्यवस्थापक अजिंक्य जैवळ यांनी सांगितले.
advertisement
जालना रेल्वे स्थानकात दोन प्रवासी यात्रा शेड व बसस्थानकात देखील एक प्रवासी यात्रा शेड करण्यात आले आहे. यामध्ये भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसची माहिती व प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी यंत्र अभियंता स्वप्निल मास्कर, आगार व्यवस्थापक अजिंक्य जैवळ प्रवाशांना मार्गदर्शन करत आहेत. जालना आगारातून 37, अंबड 30, जाफ्राबाद 30, परतूर 18, अशा एकूण 115 बस सैलानी यात्रेसाठी जालना विभागातून सोडण्यात येणार आहेत. सैलानी यात्रेसाठी एसटीने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी विशेष मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, भाविकांनी सुरक्षित प्रवासाकरिता महामंडळाच्या बसनेच प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रण मनीषा सपकाळ यांनी केला आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Mar 13, 2025 12:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
सैलानी बाबा यात्रा, भाविकांसाठी ‘एसटी’चा मोठा निर्णय, जालन्यातून 115 बस







