Cabinet Meeting: अजित पवारांच्या मनात असलेले ३ निर्णय कॅबिनेटने घेतले, दादांचं स्वप्न पूर्ण, मंत्रिमंडळाची अनोखी आदरांजली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत १९ मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अजित पवार यांनी पाठपुरावा केलेले तीन महत्त्वाचे निर्णय घेऊन मंत्रिमंडळाने त्यांना अनोखी आदरांजली वाहिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नव्याने उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचे असलेले निर्णय घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासहित संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले.
अजितदादांच्या मनातील ३ निर्णय
१) बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता. यातून ८० हजार चौरस मीटरवर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
advertisement
२) पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज. एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता. (उद्योग विभाग)
३) पुणे जिल्ह्यातील रत्नपुरी मळा (ता. इंदापूर) येथील एमआयडीसीला जमीन मिळणार. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन नविन औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीला हस्तांतरीत होणार. उद्योजकांसाठी दिलासा, गुंतवणूक व रोजगार संधी निर्माण होणार (महसूल विभाग)
advertisement
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
इंदापूरच्या मातीशी आणि इथल्या जनतेशी दादांचे नाते अतूट होते. इथल्या युवकांच्या हाताला काम मिळावे, उद्योगांच्या माध्यमातून तालुक्याला नवी उभारी मिळावी, हे त्यांचे स्वप्न होते. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत रत्नपुरी मळ्यातील १००० एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला, ही समाधानाची बाब आहे. याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळातील सदस्यांचे मनापासून आभार मानते.
advertisement
हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तर दादांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेले ठोस पाऊल आहे. इंदापूर, बारामती आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाव्यात, स्थानिक उद्योजकतेला बळ मिळावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 6:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Cabinet Meeting: अजित पवारांच्या मनात असलेले ३ निर्णय कॅबिनेटने घेतले, दादांचं स्वप्न पूर्ण, मंत्रिमंडळाची अनोखी आदरांजली








