पती बेपत्ता, भोंदूने डाव साधला, घरात घुसून विवाहितेवर अत्याचार, खरातनंतर नागपुरात किळसवाणा प्रकार!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना आता नागपूरमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. त्याने भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचाराची ही घटना ताजी असताना आता नागपूरमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका भोंदूबाबाने विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी भोंदूला बेड्या ठोकल्या आहेत.
ताहीर बेग असं अटक केलेल्या ६५ वर्षीय भोंदूबाबाचं नाव आहे. त्याने पीडित विवाहितेला पूजा करण्याच्या आणि आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे. याप्रकरणी नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी भोंदूबाबाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अमरावती येथून अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला नागपूर येथील रहिवासी आहे. ती एका खासगी संस्थेत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिचा पती ऑक्टोबर महिन्यापासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेऊनही पती सापडत नसल्याने त्या हवालदिल झाल्या आहेत. दरम्यान, एका विवाह समारंभात तिची आरोपी भोंदू बाबाशी ओळख झाली. तिने आपली हकीकत आरोपीला सांगितली. यानंतर आरोपी भोंदूने नवऱ्याला परत आणण्यासाठी पूजा करावी लागेल, असं सांगितलं.
advertisement
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भोंदूबाबाने पूजा घालण्याच्या नावाखाली महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर अत्याचाराची वाच्यता केल्यास देवाचा प्रकोप होईल, अशी भीतीही त्याने दाखवली. मात्र पीडितेनं धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार केली. रितसर गुन्हा दाखल होताच नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी अमरावतीतून भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 8:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पती बेपत्ता, भोंदूने डाव साधला, घरात घुसून विवाहितेवर अत्याचार, खरातनंतर नागपुरात किळसवाणा प्रकार!







