Mumbai Local : लेडीज डब्ब्यात बुरखा घालून शिरला, विकृतचाळे करताचा महिलांचा आक्रोश, धावत्या लोकलमध्ये काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुरुषाने बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने महिला प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानक परिसरात घडली आहे. एका पुरुषाने बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने महिला प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, गर्दीचा फायदा घेत संबंधित आरोपीने बुरखा परिधान करत महिलांच्या डब्यात प्रवेश केला. सुरुवातीला तो पुरुष असल्याचा संशय कोणालाही आला नाही. मात्र, प्रवासादरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने काही महिलांनी त्याच्याकडे बारकाईने निरीक्षण केले. त्यानंतर संबंधित व्यक्ती पुरुष असल्याचे स्पष्ट होताच महिलांमध्ये एकच खळबळ उडाली.
advertisement
तात्काळ अटक करण्यात अपयश
प्रवाशांच्या लक्षात येताच काही महिलांनी तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर GRP (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) आणि RPF (रेल्वे संरक्षण दल) यांची पथके घटनास्थळी रवाना झाली. मात्र, तोपर्यंत आरोपीने संधी साधून लोकलमधून उडी मारून पळ काढल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांना त्याला तात्काळ अटक करण्यात अपयश आले.
advertisement
लोकलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात
घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी स्थानक परिसरातील तसेच लोकलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement
Mumbai Local Video :
महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, या घटनेमुळे मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डबे, सुरक्षा कर्मचारी, सीसीटीव्ही आणि गस्त वाढवूनही अशा घटना घडत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना, तपासणी आणि सतर्कता वाढवण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 7:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Local : लेडीज डब्ब्यात बुरखा घालून शिरला, विकृतचाळे करताचा महिलांचा आक्रोश, धावत्या लोकलमध्ये काय घडलं?










