आता 15 मिनिटांत होणार कॅन्सरचं निदान, जे अमेरिकेला जमलं नाही ते नागपुरातील गुरु-शिष्यानं केलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नागपुरात एका शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या जोडीनं असं भन्नाट तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला भविष्यात कर्करोग होणार की नाही, हे आधीच कळणार आहे.
नागपूर: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कॅन्सरचं निदान झालं, तर त्या व्यक्तीची वैयक्तीक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी होते. पण या आजारामुळे अनेक कुटुंबं देखील उद्ध्वस्त होतात. अनेकदा कर्करोगावरील उपचार अत्यंत महागडा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. त्यामुळे हा आजार झाल्यास उपचाराअभावी अनेकांना आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमवावं लागतं.
पण आता नागपुरात एका शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या जोडीनं असं भन्नाट तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला भविष्यात कर्करोग होणार की नाही, हे आधीच कळणार आहे. हे तंत्रज्ञान मुख कर्करोगाचं निदान करणार आहे. अवघ्या १५ मिनिटांत लाळेची (Saliva) चाचणी करून मुख कर्करोगाचे निदान होणार आहे. हे कर्करोगाच्या विरोधातल्या लढाईतील एकं अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे.
advertisement
या नवीन संशोधनामुळे जगभरात लाखो मानवी प्राण वाचवण्यात यश मिळू शकेल, अशी खात्री तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खरं तर, कर्करोगाची लक्षणे आणि निदान उशिरा होत असल्याने वेळ, पैसे आणि कित्येक वेळा जीवही गमवावा लागतो. पण वेळीच कॅन्सरचं निदान झालं तर कॅन्सरपासून हमखास मुक्ती मिळू शकते.
आता कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता केवळ पंधरा मिनिटांत त्याला भविष्यात तोंडाचा कर्करोग होणार आहे किंवा नाही, याचे खात्रीलायक निदान करणारे हे तंत्रज्ञान आपल्या भारतात विकसित करण्यात आले आहे. अशा पद्धतीचं हे जगातील पहिले तंत्रज्ञान आहे. यामुळे आता कॅन्सर होण्याच्या आधीच त्याचे नेमके निदान शक्य झाले आहे. नागपूर येथील एका प्राध्यापक आणि विद्यार्थ्याच्या जोडीने ही कमाल केली असून त्यांच्या संशोधनाला अमेरिकेचे पेटंट आणि भारतीय पेटंट देखील मिळालं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक देवव्रत बेगडे आणि विद्यार्थी शुभेन्द्रसिंग ठाकूर यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
Feb 22, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आता 15 मिनिटांत होणार कॅन्सरचं निदान, जे अमेरिकेला जमलं नाही ते नागपुरातील गुरु-शिष्यानं केलं










