घरापासून हाकेच्या अंतरावर असताना काळाचा घाला, बाजार करून येणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सांगोला आठवडा बाजारावरून परतणारे रामचंद्र बनसोडे आणि लक्ष्मी बनसोडे यांचा बामणी जवळ भंगार ट्रक अपघातात मृत्यू होऊन बामणी गाव शोकाकुल.
रविवार म्हणजे आठवडा बाजाराचा दिवस, घरातलं संपलेलं साहित्य भरण्यासाठी पती-पत्नी दोघंही निघाले, आठवड्याचा बाजार केला आणि त्यानंतर पुन्हा घरी जायचा निघाले. दोघंही मार्केट करून झाल्यानंतर गप्पा मारत घरी निघालेलं असताना काळानं घात केला. 60 वर्षीय रामचंद्र बनसोडे पत्नी लक्ष्मीसोबत सांगोल्याचा आठवड्याचा बाजार आटोपून दुचाकीवरून बामणी इथे आपल्या घराकडे निघाले होते. पिशवीत आठवड्याभराचा किराणा, भाजीपाला आणि मनात घराकडे जाण्याची ओढ होती. पण त्यांना काय ठाऊक, की घरापासून अवघ्या काही अंतरावर मृत्यू त्यांचा थरकाप उडवण्यासाठी दबा धरून बसला आहे.
भंगाराच्या ढिगाऱ्याखाली गुदमरला श्वास!
देशमुख वस्तीजवळच्या वळणावर मागून येणाऱ्या एका भंगाराने भरलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. भंगाराचं सामान जास्त होतं. ट्रक पूर्ण आडवा झाला आणि भंगाराचं सामान कोसळलं. धडक इतकी भयानक होती की, रामचंद्र बनसोडे यांचा जागीच जीव गेला. त्यांचा मृतदेह आणि दुचाकी टेम्पोतून सांडलेल्या भंगाराच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. परिस्थिती इतकी बिकट होती की, त्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क दोन क्रेन बोलावून ते लोखंडी भंगार बाजूला करावं लागलं.
advertisement
पतीचा जागीच मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज अपयशी
लक्ष्मी बनसोडे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या. गंभीर दुखापत झाली रक्तस्त्राव झाला, स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांचाही उपचारादरम्यान जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. ज्या संसाराचा गाडा दोघांनी मिळून आयुष्यभर ओढला, त्या संसाराचा अंतही एकाच वेळी, एकाच अपघातात झाला.
advertisement
अपघातानंतर टेम्पो उलटला तिथे भंगाराच्या ढिगाऱ्यात या दांपत्याचा बाजार आणि त्यांची स्वप्नं विखुरली होती. या अपघातामुळे सांगोला-पंढरपूर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस या घटनेची नोंद करत होते, मात्र बामणी गावात या बातमीने शोककळा पसरली आहे. घर अगदी काही अंतरावर असताना हा भीषण अपघात झाला आणि दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 1:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरापासून हाकेच्या अंतरावर असताना काळाचा घाला, बाजार करून येणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू









