उपसरपंच मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणीत वाढ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या आहेत.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आत्महत्या केली होती. त्यांनी नर्तिका पूजा गायकवाडच्या घराबाहेर कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण
पूजा गायकवाड हिने प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे बीड येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी सप्टेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. स्वत:चा बंगला आणि पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी पूजा गायकवाडने सातत्याने मानसिक दबाव आणला होता. या त्रासाला कंटाळून बर्गे यांनी आपलं जीवन संपवलं होतं.
advertisement
सरकारी वकिलांचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद
या प्रकरणातील आरोपी नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मिळू नये, यासाठी जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले की, "जर आरोपी पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर केला, तर समाजात एक अत्यंत चुकीचा संदेश जाईल. एवढेच नाही, तर अशा महिलांकडून इतर पुरुषांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळवणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही."
advertisement
सरकारी वकिलांचा हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयाने समाजावर होणारे संभाव्य परिणाम आणि गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन नर्तिका पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी पूजा गायकवाडकडून अॅड. आर. डी. तारके यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा गायकवाडचा कारागृहातला मुक्काम वाढला असून तिच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 18, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
उपसरपंच मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणीत वाढ