Baramati Election: सुनेत्रा पवारांकडून काल ठाकरेंना फोन, आज सपकाळ-जानकरांना फोन, बारामती पोटनिवडणुकीबाबत पडद्याामागे मोठी घडामोड...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:susmita Bhadane patil
Last Updated:
Baramati Bypoll: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
बारामती: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, आज सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे नेते महादेव जानकर यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. मात्र, काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बारामती बिनविरोध होण्याच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. काँग्रेसने हायकमांडच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वीच बारामती पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी काहींना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसने काय म्हटले?
सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, सपकाळ यांनी दिल्लीतील हायकमांडचा दाखला देत स्पष्ट केले की, "दिल्लीतून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याचे आदेश आहेत." काँग्रेस हायकमांड या निवडणुकीसाठी आग्रही असल्याने सुनेत्रा पवारांच्या विनंतीला काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे बारामतीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
advertisement
महादेव जानकरांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका
दुसरीकडे, महादेव जानकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करताना सावध पवित्रा घेतला. "आम्ही काँग्रेसच्या भूमिकेनुसार आणि महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार पुढील पाऊल उचलणार आहोत," असे जानकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जानकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सुनेत्रा पवारांना आता आघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाची मते लक्षणीय आहेत. त्यामुळे जानकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
advertisement
दरम्यान, कालच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. ठाकरे गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. एकीकडे बड्या नेत्यांशी चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे बारामतीमध्ये आतापर्यंत तब्बल १९ अपक्ष आणि इतर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baramati Election: सुनेत्रा पवारांकडून काल ठाकरेंना फोन, आज सपकाळ-जानकरांना फोन, बारामती पोटनिवडणुकीबाबत पडद्याामागे मोठी घडामोड...








