भाजपने निष्ठावंतांना डावललं, उमेदवारीसाठी मारामारी, कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारं सुषमा अंधारेंचं पत्र
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sushma Andhare letter To BJP Karyakarta: भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारे पत्र लिहिले आहे.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक खरे तर कार्यकर्त्यांची. पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे नेतृत्व याच निवडणुकीतून तयार होते. तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीत संधी मिळणार म्हणून सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते आनंदात होते. परंतु या निवडणुकीत निष्ठावंतांना बाजूला सारून इतर पक्षातील आयात उमेदवारांना तिकीटे दिल्याने भाजपमध्ये प्रचंड रोष उफाळून आला. कुठे कार्यकर्त्यांनी नेत्यांना तोंडावर शिव्या दिल्या, अगदी कानफटीत मारायला देखील मागेपुढे पाहिले नाही. कुठे इच्छुक उमेदवारांनी पक्षाला तळतळाट लागेल असा शाप दिला. तर कुठे कार्यकर्त्यांनी आमदारांच्या गाडीचा पाठलाग केला. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अशी वेळ ओढावल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारे पत्र लिहिले आहे.
प्रिय कार्यकर्ता भावांनो आणि बहिणींनो,
कसे आहात सगळे? विशेषत: निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनो, खरंतर हा प्रश्न विचारणेच व्यर्थ आहे. कारण तुमची अस्वस्थता, तुमचा आक्रोश, तुमची हतबलता हे विविध वृत्तवाहिन्यांवरून आणि समाज माध्यमांवरून सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. पोहोचत नाही ते फक्त तुमच्या नेत्यांपर्यंत...!
काल संभाजीनगरमध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड असतानाही एका भाजपच्या कार्यकर्तीने स्थानिक नेत्याच्या कानाखाली जाळ काढला. नाशिकमध्ये एबी फॉर्म घेऊन पळणाऱ्या आमदाराच्या मागे काही कार्यकर्ते पळताना दिसले. पुण्यामध्ये शिंदेसेनेचे लोक आक्रमक होऊन आमची तिकिटे विकली असे म्हणत एका महिला नेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाला. आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट नाही असं जरी देवेंद्रजींनी म्हटलं असलं तरी राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा आणि सुनेला पुण्यात भाजपने उमेदवारी दिलीच. तेही निष्ठावंत जगदीश मुळीक यांचा विरोध मोडीत काढून! मुंबईमध्ये तर भाजपमध्ये अगदी नव्याने पाऊल ठेवलेल्या घोसाळकरांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या उपस्थितीतच इच्छुक महिलेने अत्यंत शांतपणे भाजपला धारदार प्रश्न विचारले. पण या सगळ्यांचे फलित काय.? खरंच या सगळ्यांना न्याय मिळणार आहे का? कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेत्यांनी तुम्हाला झुलवत ठेवले! छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई, नाशिक अशा महानगरांमधून हा आक्रोश का दिसत होता? महाविद्यालयीन काळामध्ये कुठेतरी वाचल्याचं आठवतंय, रात्रीच्या शांततेमध्ये रातकिडे किरकिरतात. त्याचा त्रास भयंकर होतो. पण त्याहीपेक्षा नेमका आवाज कुठून येतोय याचाच शोध लागत नाही, त्याचा अधिक त्रास होतो.
advertisement
काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या काही तासांमध्ये जी धावपळ, गोंधळ, आत्मदहनाचे प्रयत्न, भाजप नेत्यांच्या मुस्काडात मारणे , एबी फॉर्मच गिळून टाकणे, पक्ष कार्यालयासमोर उपोषणाला बसणे हा सगळा त्रागा आत्मक्लेष का आणि कशासाठी? फक्त उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही एवढं एकच कारण याच्यामागे असेल का ? नाही. एवढंच कारण नाही.
advertisement
तुम्हाला आशा होत्या, ज्या पक्षासाठी खांदा झिजला तो पक्ष न्याय देईल पण....
दादाहो मायाहो, 2024 सरत असतानाच निवडणुका आज लागतील, उद्या लागतील म्हणत म्हणत कधी गणेशोत्सव.. तर कधी नवरात्री.. कधी दहीहंडी तर कधी कुठला भंडारा... कधी कुठली जयंती., कधी पुण्यतिथी.. कधी हळद कुंकू.. तर कधी एखादा उरूस अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही लाखोंच्या देणग्या देत राहिलात.. तब्बल दीड वर्षांपासून बॅनरबाजी मित्र मंडळ, त्यांच्या पार्ट्या हे सगळं निमूटपणाने करत राहिलात . कारण तुम्हाला आशा होती, ज्या पक्षाच्या वर्षानुवर्ष सतरंज्या उचलल्या आहेत.. ज्या पक्षाचा झेंडा वागवताना तुमचा खांदा झिजला आहे. तो पक्ष तुमच्या निष्ठेला न्याय देईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू घेऊन ज्या स्वयंसेवकांनी अत्यंत निगुतीने शाखा चालवल्या.. आठवड्यातून मिळणारा सुट्टीचा एक रविवार आपल्या कुटुंबासोबत घालवण्यापेक्षा पक्ष बांधणीसाठी हसत हसत दिला.. समाज माध्यमावर भाजप नेत्यांची प्रत्येक कृती हा कसा रणनीतीचा भाग आहे हे पटवून सांगण्यासाठी बुद्धी पणाला लावली.. आपण करत असलेलं समर्थन अत्यंत लंगडं आहे, वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, हे कळत असताना सुद्धा आणि त्यामुळे स्वतःची अवहेलना होत आहे हे समजून सुद्धा प्रसंगी जहाल विकृत टीका टिप्पणी सहन केल्या. त्याची जाणीव कुठेतरी पक्ष नेतृत्व ठेवेल असं वाटत होतं.
advertisement
निष्ठावंतांना न्याय द्यायला ही तत्त्वनिष्ठ भाजपा कुठे आहे?
पण निष्ठावंतांना न्याय द्यायला ही तत्त्वनिष्ठ भाजपा कुठे आहे? अटलजी गेले. महाराष्ट्रात प्रमोद महाजन–गोपीनाथ मुंडे गेले आणि पाठोपाठ तत्वनिष्ठ भाजपही संपली. आता जी भाजपा उरली आहे ती सत्तेच्या प्रचंड महत्वकांक्षा बाळगून प्रसंगी ज्यांच्या अंगाखांद्यावर पक्ष वाढला त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवत निष्ठावंतांना चिरडून टाकणारी भाजपा उरलीय. आमदार देवयानी फरांदे यांच्या डोळ्यातलं पाणी, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला दरवाजा नसलेल्या शनि शिंगणापूरचा उल्लेख, नितीन गडकरींनी आपल्याच नेत्यांचे उपटलेले कान, हे सगळं एका दिवसात-एका तासात नाही घडलं...
advertisement
भाजप आपल्याच कार्यकर्त्यांना आनंदी आणि समाधानी का ठेवू शकत नाही?
खरंतर सर्व प्रकारच्या स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून आणि साम–दाम–दंड–भेद नीती अवलंबून भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली. सत्तेचा कळस रचला. कळसावर सर्व प्रकारच्या संविधानिक स्वायत्त यंत्रणांच्या मुडदा पाडून हुकूमशाहीचा झेंडा रोवला. तरीसुद्धा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता मिळवणारा विश्वव्यापी भारतीय जनता पक्ष आपल्याच कार्यकर्त्यांना आनंदी आणि समाधानी का ठेवू शकत नाही? तर त्याचं साधं उत्तर आहे. सत्ता मिळाली तरी सत्ता पचवता आली पाहिजे. पराभव पचवणं जितका कठीण आहे; तितकंच कठीण आहे मिळालेलं यश पचवणं...! भाजपला मिळालेलं यश पचवता येत नाहीय... दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेचा कळस गाठल्यानंतर आणि कळसावर एकाधिकारशाहीचा झेंडा लावल्यानंतरही आपली सगळी शक्ती ज्या कार्यकर्त्यांमुळे ही सत्ता मिळाली त्यांच्यामध्ये वितरित करून त्यांना समाधानी ठेवण्यासाठी, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी आणि राजकीय उन्नतीसाठी वापरण्यापेक्षा विरोधकांना वाकोल्या दाखवण्यासाठी आणि अजस्त्र पाशवी सत्तेचा माज दाखवण्यासाठी वापरली जात आहे.
advertisement
ज्यांनी घर बांधलं त्यांनाच घरातून निर्वासित करण्याचा अत्यंत क्रूर मार्ग अवलंबिला
अजस्त्र पाशवी बहुमत मिळालं तरी सुद्धा विरोधक शिल्लक ठेवायचा नाही या असुरी सत्ताकांक्षेने पछाडलेले देवेंद्र फडणवीस आणि शीर्ष भाजप नेतृत्व यांनी विरोधकांवर सूड उगवण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीसी कारवाया यांचा धाक दाखवत एक एक भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुन्हेगार, गुंड, तडीपार यांना प्रवेश देण्याचा सपाटा चालू केला. पण एवढे लोक घरात घेतल्यावर मुळात त्यांना राहण्याची जागा कशी करून देणार? नवीन आलेल्या लोकांना जागा करून देण्यासाठी मग ज्यांनी चिखल-माती-गाळ उपसून घर बांधलं होतं त्यांनाच घरातून निर्वासित करण्याचा अत्यंत क्रूर मार्ग भाजपने अवलंबिला.
advertisement
वारुळात विषारी नाग राहायला येतात...!
दादाहो, तुम्ही कधी वारूळ बघितलं का? वारूळ मुंग्या बांधतात. पण एकदा का वारूळ पूर्ण झालं की त्यात राहण्याचं भाग्य मात्र मुंग्यांना लाभत नाही. वारुळात विषारी नाग राहायला येतात...! भाजपचं सुद्धा तेच झालंय..! आम्ही काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करू अशी गर्जना करणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे राजकीय लाभार्थी या सगळ्यांनी मिळून निष्ठावंतांचा घात काढला. ज्या जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी आणि संघाच्या मुशीतून आलेल्या स्वयंसेवकांनी भाजपच्या सत्तेचं वारूळ बांधलं. मात्र त्या वारुळातून या जुन्या निष्ठावंतांना निष्कासित करून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असे सगळीकडून तडीपार गुंड, गुन्हेगार, बलात्कारी, भ्रष्टाचारी, अरबो-खरबोंची माया जमा केलेले सत्तांध स्वार्थी विषारी नाग आता वारुळात राहायला आले.. यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली..
तुम्ही परिवारातील सदस्य नाही, सत्तेसाठी लागणाऱ्या शिडीतील फक्त एक पायरी
दादाहो, तुम्ही ज्यांना पक्ष नाही 'मोदी का परिवार' मानत आलात त्यांच्यासाठी तुम्ही परिवारातील सदस्य नाही तर सत्तेसाठी लागणाऱ्या शिडीतील फक्त एक पायरी आहात..! रातकिड्यांच्या किरकीरण्याचा आवाज नेमका कुठून येतोय तर तो इथून...! नव्यांना घरात जागा देण्यासाठी जुन्यांना बेघर करत रस्त्यावर आणलंय.
तुम्ही सगळे लढाऊ-झुंजार, सत्तेचा अमर पट्टा घेऊन कुणीही आलेला नाही
असो, तुम्ही सगळे लढाऊ आहात-झुंजार आहात. अजून खूप लढाया लढायच्या आहेत. पण आता इतरांसाठी लढण्यापेक्षा चला कुटुंबाकडे लक्ष देऊया. लक्षात ठेवा. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. सत्तेचा अमर पट्टा घेऊन कुणीही आलेला नाही. ज्यांनी आज तुम्हाला सत्तेचा रुबाब दाखवला आहे तेही कधी ना कधी या सत्तेतून पायउतार होणारच आहेत.. ! कारण, "याद रख सिकंदर के हौंसले तो आली थे, जब मरा सिकंदर तो उसके दोनों हाथ खाली थे..! "
कळावे
आपली बहीण
सुषमा अंधारे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 8:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपने निष्ठावंतांना डावललं, उमेदवारीसाठी मारामारी, कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारं सुषमा अंधारेंचं पत्र










