टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालायचे, कुणी केला दावा? नव्या वादाला तोंड
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष म्हटल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेऊन मोर्चे काढले आहेत.
मुंबई : मालेगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्यावरून उद्भवलेल्या वादावर पडदा पडला खरा, पण टिपू सुलतान स्वराज्यप्रेमी की हिंदू समुदायावर अन्याय करणारा? अशी चर्चा पुन्हा झडू लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष म्हटल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेऊन मोर्चे काढले आहेत. तर काँग्रेसकडूनही भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्त्ववादी संघटनांना जोरदार उत्तर दिले जात आहे.
एकीकडे हिंदुत्त्ववाद्यांकडून टिपू सुलतान यांची प्रतिमा हिंदूविरोधी अशी रंगवली जात आहे तर दुसरीकडे टिपूप्रेमींकडून त्यांची प्रतिमा स्वराज्यरक्षक, इंग्रजांविरोधात बंड करून पेटून उठणारा क्रांतीकारक असे गुणविशेष सांगितले जात आहेत. या सगळ्यात एमआयएमचे प्रमुख बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एक दावा केला आहे.
टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालायचे
टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले. इंग्रजांपासून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी टिपूने तलवार उचलली आणि इंग्रजांशी लढताना त्यांनी वीरमरण आले. इंग्रजांचे सैन्य टिपू सुलतान यांना एवढे घाबरायचे की ज्यावेळी टिपू मृत्यूमुखी पडले त्यानंतर त्यांच्या जवळ जायची हिम्मत सैन्याने केली नाही. टिपूच्या मृतदेहाशेजारी सोन्याची अंगठी सापडली, त्यावर राम असे लिहिलेले होते, असे सांगून टिपू यांच्या हिंदू धर्मावरील प्रेमाला अप्रत्यक्षपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असदुद्दीन ओवैसी यांनी केला. तसेच पुढे टिपू सुलतान यांच्या श्रीराम लिहिलेल्या अंगठीचा लिलाव झाला, असेही ओवैसी यांनी आवर्जून सांगितले.
advertisement
एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या 'विंग्ज ऑफ फायर' या पुस्तकात लिहिले आहे की आज भारतात जे काही क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि रॉकेट तंत्रज्ञान आहे, ते आपण टिपूची स्वप्ने पूर्ण करत आहोत हे खोटे आहे का? गांधींनी त्यांच्या यंग एज मासिकात लिहिले आहे की टिपू सुलतान हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे मूर्त स्वरूप आहे...हे खोटे आहे का? असे सवाल ओवैसी यांनी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्त्ववादी संघटनांना विचारले.
advertisement
वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहेत. टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगतसिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. संविधानाच्या मूळ प्रतीवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे.
advertisement
फडणवीस यांच्याकडून सपकाळांवर पलटवार
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या विरोधात लढाई करून स्वराज्याची निर्मिती केली. दुसरीकडे हजारो हिंदूंची कत्तल करणारा टिपू सुलतान आहे. या दोघांना एकसमान आदर दिला जावा अशी जर काँग्रेसची मागणी असेल, तर मतांच्या लांगूल चालनासाठी या लोकांनी कितीही बूट चाटले तरी महाराष्ट्र आणि देश अशा गोष्टी सहन करून घेणार नाही. छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांची तुलना करताना हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, ते कुठल्या शाळेत शिकलेत? असा बोचरा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 1:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालायचे, कुणी केला दावा? नव्या वादाला तोंड







