मतदानासाठी मुंबईहून आले, पण पुण्याच्या वरंधा घाटातच भयंकर घडलं, 4 जणांसह भरधाव कार दरीत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील भोर-महाड मार्गावरील प्रसिद्ध वरंधा घाटात एक भीषण अपघात झाला आहे. शिरगाव गावच्या हद्दीत एक वॅगनआर कार सुमारे १२० फूट खोल दरीत कोसळली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील भोर-महाड मार्गावरील प्रसिद्ध वरंधा घाटात एक भीषण अपघात झाला आहे. शिरगाव गावच्या हद्दीत एक वॅगनआर कार सुमारे १२० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, कार दरीत कोसळत असतानाच त्यातील चार प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार महाडहून भोरच्या दिशेने येत होती. घाटातील शिरगाव गावच्या हद्दीत एका धोकादायक वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. कार दरीत कोसळत असल्याचं लक्षात येताच, कारमधील चौघांनीही क्षणाचाही विलंब न लावता बाहेर उड्या मारल्या. यामुळे चौघांचा जीव वाचला आहे. मात्र चौघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
advertisement
मतदान करून परतताना काळाचा घाला
अपघातातील प्रवासी हे मूळचे महाड तालुक्यातील रहिवासी असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी ते मुंबईहून गावाला आले होते. मतदान पार पडल्यानंतर ते पुन्हा मुंबईकडे परत जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघाताचा आवाज ऐकताच शिरगाव येथील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना धीर देत जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.
advertisement
झाडाच्या फांदीमुळे कार अडकली
१२० फूट खोल दरीत कोसळलेली कार खाली जाताना एका झाडाच्या मोठ्या फांदीला अडकली आहे. ही कार बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानासाठी मुंबईहून आले, पण पुण्याच्या वरंधा घाटातच भयंकर घडलं, 4 जणांसह भरधाव कार दरीत






