एक साधा रिक्षावाला, तर दुसरे स्वीय सहाय्यक, रत्नागिरी ZP पंचायत समितीचे मैदान गाजवणारे आहेत तरी कोण ?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ratnagiri ZP Election 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र या निकालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक चर्चेत ठरला आहे.
रत्नागिरी : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र या निकालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक चर्चेत ठरला आहे. यामागे कारण ठरले ते राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिवसेनेने जिल्ह्यात दणदणीत विजय मिळवला असतानाच, त्यांच्या वैयक्तिक निर्णयांमुळे निवडून आलेले दोन उमेदवार विशेष चर्चेचा विषय ठरले आहेत.
पहाटेचा मेसेज आला अन् उमेदवारी मिळाली
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी कशी मिळाली? याबाबतचा किस्सा त्यांनी सांगितला. सामंत म्हणाले की, सुरुवातीला आपण पीएला उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत नव्हतो. मात्र एका साध्या कार्यकर्त्याच्या पहाटे तीन वाजता आलेल्या मेसेजने संपूर्ण समीकरण बदलले.
उमेदवारी देण्यामागचा विचार
तिकीट वाटपाच्या काळात अनेक कार्यकर्ते नेताजी यांना उमेदवारी देण्याची मागणी करत होते. तरीही उदय सामंत साशंक होते. “नेताजी माझ्यासोबत गेली २० वर्षे काम करत आहे, म्हणूनच मी त्याला उमेदवारी देऊ नये, असाच माझा विचार होता,” असे सामंत यांनी सांगितले. मात्र त्या पहाटे आलेल्या मेसेजमध्ये कार्यकर्त्याने स्पष्टपणे लिहिले होते की, जिल्हा परिषदेत मोठ्या आवेशात वावरणारा नेता नको, तर जमिनीवर काम करणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा माणूस हवा आहे. हा विचार सामंत यांच्या मनाला भावला आणि त्यांनी अखेर नेताजी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास
या निर्णयानंतर नेताजी यांनी निवडणुकीत दमदार कामगिरी करत विजय मिळवला. सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास, स्थानिक संपर्क आणि लोकांच्या प्रश्नांशी असलेली नाळ यामुळे हा विजय शक्य झाला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सामंत यांनीही या विजयाचे श्रेय थेट कार्यकर्त्यांच्या विश्वासाला दिले.
रिक्षाचालक सुमेश आंबेकरला उमेदवारी
उदय सामंत यांनी सांगितले की, सुमेश जरी रिक्षाचालक असला तरी तो रात्री-अपरात्री लोकांना स्टेशनला पोहोचवणे, गरजूंना मदत करणे अशी सेवा सातत्याने करत होता. “तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, पण समाजासाठी झटणारा आहे,” या विश्वासावर त्याला उमेदवारी देण्यात आली आणि सुमेश आंबेकर देखील निवडून आला.
advertisement
रत्नागिरीत सामंत यांचे निर्विवाद वर्चस्व
अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. जिल्हा परिषदेच्या दहाही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला, तर पंचायत समितीमध्ये मित्र पक्ष भाजपसह महायुतीने २० पैकी २० गण जिंकत क्लीन स्वीप केला.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 11:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक साधा रिक्षावाला, तर दुसरे स्वीय सहाय्यक, रत्नागिरी ZP पंचायत समितीचे मैदान गाजवणारे आहेत तरी कोण ?









