sanjiv bhasin: शेअर मार्केटमध्ये नवा हर्षद मेहता स्कॅम? टीव्हीवर लोकांना द्यायचे शेअर विकत घेण्याचा सल्ला, नंतर करायचे 'गेम'
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
भसीन अगोदर एका खासगी कंपनीला काही शेअर्स खरेदी करण्याची सूचना देत होते. त्यानंतर टीव्हीवर येऊन त्याच शेअर्सची शिफारस प्रेक्षकांना करत होते.
मुंबई: शेअर बाजार नियामक सेबी ही संस्था शेअर मार्केटमधल्या कथित हेराफेरीच्या प्रकरणात संजीव भसीन यांची चौकशी करत आहे. या प्रकरणाशी थेट संबंधित असलेल्या लोकांनी मनीकंट्रोलला याबाबत माहिती दिली आहे. संजीव भसीन हे आयआयएफएल सिक्युरिटीजशी संबंधित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाचा भाग म्हणून सेबीने भसीन यांच्या डिजिटल उपकरणांची तपासणी करून पुरावे गोळा केले आहेत. मनीकंट्रोलने विचारलेल्या प्रश्नांना भसीन आणि सेबीने उत्तर दिलेलं नाही. आयआयएफएल सिक्युरिटीजने मनीकंट्रोलला सांगितलं, की भसीन त्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य नव्हते. त्यांचा कार्यकाळ मुदतीपूर्वीच संमाप्त करण्यात आला होता.
आयआयएफएल सिक्युरिटीजने एका निवेदनात म्हटलं आहे, की "संजीव भसीन हे आयआयएफएल सिक्युरिटीजमध्ये कॉन्ट्रॅक्टवर सल्लागार होते. त्यांचा कार्यकाळ 30 जून 2024 रोजी संपणार होता; पण आरोग्याच्या कारणांमुळे भसीन यांचा करार 17 जून 2024 रोजी समाप्त करण्यात आला. भसीन यांनी आम्हाला सेबीच्या तपासाविषयी माहिती दिली होती; पण तपासाचे तपशील त्यांनी उघड केले नव्हते. त्यामुळे आम्ही याबाबत भाष्य करू शकणार नाही. ते आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेडच्या संचालक मंडळाचे किंवा आमच्या समूहाच्या इतर कोणत्याही कंपनीचे किंवा सहयोगी फर्मचे सदस्य नव्हते."
advertisement
भसीन हे देशातल्या व्यावसायिक टीव्ही चॅनेल्सवरचा एक प्रसिद्ध चेहरा आहेत. ते स्टॉक आणि मार्केट सेंटिमेंटबद्दलच्या चर्चांमध्ये सहभागी होत असतात.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भसीन अगोदर एका खासगी कंपनीला काही शेअर्स खरेदी करण्याची सूचना देत होते. त्यानंतर टीव्हीवर येऊन त्याच शेअर्सची शिफारस प्रेक्षकांना करत होते. शेअर्समध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आणि त्यांच्या किमती वाढल्या, की संबंधित खासगी कंपनी हे शेअर्स विकून मार्केटमधून बाहेर पडायची.
advertisement
शेअर मार्केटच्या भाषेत अशा प्रकरणांना 'पंप अँड डंप स्कीम' म्हणतात. भसीन आणि या खासगी कंपनीतल्या संबंधांचाही तपास सुरू आहे. दोन सूत्रांनी सांगितलं, की सेबीला गेल्या काही वर्षांच्या डिजिटल रेकॉर्डवरून या प्रकरणामध्ये भसीन यांच्या सहभागाचे पुरावे मिळाले आहेत.
संजीव भसीन यांनी गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर आपली उपस्थिती कमी केली आहे. एवढंच नाही, तर सोशल मीडियावर ते आपल्या फॉलोअर्सचे ट्विट्स रिट्विट करत आहेत. या ट्विट्समध्ये फॉलोअर्सनी त्यांचे आभार मानलेले आहेत. 15 जूनपासून ते आता टीव्हीवर का दिसत नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. असं म्हटलं जात आहे, की 15 जूनपासूनच सेबीने संजीव भसीन यांच्या चौकशीला गती दिली होती. मीडिया प्लॅटफॉर्म, विशेषत: टीव्ही चॅनेलच्या स्टॉकच्या किमतींमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मार्केट तज्ज्ञांवर सेबी गेल्या काही दिवसांपासून कारवाई करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 26, 2024 9:27 PM IST
मराठी बातम्या/मनी/
sanjiv bhasin: शेअर मार्केटमध्ये नवा हर्षद मेहता स्कॅम? टीव्हीवर लोकांना द्यायचे शेअर विकत घेण्याचा सल्ला, नंतर करायचे 'गेम'