पब पार्टीचा भयंकर शेवट! बोरिवलीत बोनेटवर चढलेल्या तरुणीसह तरुणाने पळवली कार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Accident in Mumbai: मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका पबमधील पार्टीनंतर तरुण-तरुणीमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर एका भीषण अपघातात झालं.
मुंबई: मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका पबमधील पार्टीनंतर तरुण-तरुणीमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर एका भीषण अपघातात झालं. वाद झाल्यानंतर एका तरुणाने चक्क तरुणीला गाडीच्या बोनेटवर बसलेल्या अवस्थेतच गाडी भरधाव वेगाने चालवली. यावेळी तरुणी बोनेटवरून खाली पडून मोठा अपघात झाला. यात ती गंभीर जखमी झाली आहे.
याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विनित नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम परिसरात पबमध्ये पार्टी केल्यानंतर संबंधित तरुण आणि तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास पबमधून बाहेर पडले. यावेळी त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, वादाच्या भरात संतापलेल्या तरुणीने थेट आरोपी विनितच्या कारच्या बोनेटवर चढून बसली.
advertisement
पीडित तरुणी बोनेटवर बसलेली असतानाही आरोपी विनितने गाडी थांबवली नाही, तर त्याने गाडी तशीच भरधाव वेगाने पुढे नेली. गाडीचा वेग जास्त असल्याने समतोल बिघडून तरुणी बोनेटवरून खाली रस्त्यावर पडली. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर रस्त्यावरील स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि जखमी तरुणीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बोरिवली पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपी विनित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 2:14 PM IST


