Weather Alert: मे महिना तापणार पण महाराष्ट्रात इथं पाऊस पडणार!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 मे रोजी विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे.
पुणे : एप्रिल महिन्यात बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेल्याचे चित्र आहे. मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसह राज्यातील अनेक शहरांमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहील, तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत 1 मे रोजी किमान तापमान 27 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता असून आकाश मुख्यतः निरभ्र राहील. पुण्यात उष्णतेचा प्रकोप अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी कमाल तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि आकाश पूर्णपणे निरभ्र राहणार असल्यामुळे उन्हाचा तडाखा अधिक जाणवू शकतो.
advertisement
छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथेही कमाल तापमान अनुक्रमे 41 आणि 42 अंश सेल्सियसपर्यंत जाणार आहे. या भागांत हवामान मुख्यतः कोरडे आणि निरभ्र राहील. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे.
advertisement
नागपूरमध्ये मात्र हवामानात थोडासा बदल दिसून येईल. त्या ठिकाणी 1 मे रोजी वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी तापमानात वाढ कायम आहे. नागपूरमधील किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 42 अंश सेल्सियस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्यातील अहिल्या नगर, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून संरक्षणासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
याशिवाय, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने या भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
advertisement
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाण्याचे योग्य सेवन करणे, उन्हात अनावश्यक फिरणे टाळणे आणि शक्यतो घरात राहणे या गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
view comments
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 30, 2025 7:56 PM IST

