इन्स्टावर प्रेम; भेटीच्या ओढीने गेला मुलगा, कॅबमधून उतरताच 'प्रेयसी'चं कांड, नवी मुंबईतील घटनेनं खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपींनी एका मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून त्याच्याशी मैत्री केली. हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात झाल्याचं भासवून आरोपींनी त्याला भेटण्यासाठी बोलवलं
मुंबई : नवी मुंबईत सोशल मीडियावरील 'हनी ट्रॅप'चा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून एका १५ वर्षीय शाळकरी मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. नंतर त्याचं अपहरण करून तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. मात्र, नवी मुंबई गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत मुलाची सुखरूप सुटका केली.
ऐरोलीतील दिवा गावात राहणारा हा मुलगा दहावीत शिकतो. आरोपींनी एका मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून त्याच्याशी मैत्री केली. हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात झाल्याचं भासवून आरोपींनी त्याला भेटण्यासाठी कल्याण (पूर्व) मधील नांदिवली येथे बोलावलं. प्रेयसीला भेटण्याच्या ओढीने हा मुलगा ओला कारने तिथे पोहोचला. मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या चार अपहरणकर्त्यांनी त्याला एका खोलीत डांबून ठेवलं.
advertisement
खंडणीचा मेसेज आणि पोलिसांची कारवाई:
अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर व्हॉइस मेसेज पाठवून २० लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या पालकांनी तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ज्या कारने मुलगा गेला होता, त्या कार चालकाला शोधून काढलं. चालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदिवली येथील ठिकाणावर छापा टाकला आणि मुलाची सुटका केली.
advertisement
या प्रकरणात पोलिसांनी प्रदीपकुमार जयस्वाल (२४), विशाल पासी (१९), चंदन मौर्या (१९) आणि सत्यम यादव (१९) या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
इन्स्टावर प्रेम; भेटीच्या ओढीने गेला मुलगा, कॅबमधून उतरताच 'प्रेयसी'चं कांड, नवी मुंबईतील घटनेनं खळबळ









