इंदूरनंतर मुंबईतील किन्नर जीवावर उदार, 9 जणांचं सामूहिक विष प्राशन, नक्की काय घडतंय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अलीकडेच इंदूरमध्ये २५ किन्नरांनी विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता अशाप्रकारे मुंबईतील नऊ जणांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई: आपल्या अध्यात्मिक नेत्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद टिप्पणीमुळे व्यथित झालेल्या मुंबईतील नऊ किन्नरांनी विषारी औषध (फिनाईल) पिऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही जीव गमवावा लागला नाही. या सर्व किन्नरांना उपचारांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना विक्रोळीच्या अमृत नगर सर्कल परिसरातील ‘किन्नर माँ संस्थान’च्या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर घडली. सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या नऊ किन्नरांनी सोमवारी फिनाईलचे प्राशन केले. या प्रकारानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या नऊ किन्नरांपैकी एकाने सांगितले की, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या अध्यात्मिक नेत्या ‘सलमा खान’ आणि त्यांच्या ‘किन्नर माँ संस्थान’ या संस्थेविरोधात अत्यंत अपमानास्पद टिप्पणी केली होती. या अपमानजनक वक्तव्यामुळे दु:खी होऊन आणि संतापून त्यांनी हे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी सांगितले की, तातडीच्या उपचारांमुळे सर्व नऊ किन्नर आता सुरक्षित आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
advertisement
यापूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर येथेही अशाच प्रकारे २४ किन्नरांनी सामूहिक विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोन घटनांमुळे समाजातील एका विशिष्ट घटकात पसरलेल्या तीव्र असंतोषाकडे लक्ष वेधले गेले आहे. या प्रकरणाच्या अधिक तपशिलांची आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 9:11 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
इंदूरनंतर मुंबईतील किन्नर जीवावर उदार, 9 जणांचं सामूहिक विष प्राशन, नक्की काय घडतंय?