अमेरिकेत PhD, स्टडीसाठी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये बोलवलं, बड्या अधिकाऱ्याच्या पोराचा तरुणीवर लैंगिक अत्याचार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Mumbai: अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या एका २९ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीवर तिच्या ३१ वर्षीय सहकारी मित्राने मुंबईत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या एका २९ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीवर तिच्या ३१ वर्षीय सहकारी मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये बोलवलं होतं. याठिकाणी आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेनं वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या तरुणाने अशाप्रकारे आपल्या मैत्रिणीवर मुंबईत अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी अमेरिकेत पीएचडीचे शिक्षण घेत आहे. आरोपी मुलगा देखील इलिनॉय विद्यापीठातून पीएचडी करत आहे. अभ्यासाच्या निमित्ताने दोघांची परदेशात ओळख झाली आणि भेटीगाठी सुरू झाल्या. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि या काळात तिचे लैंगिक शोषण केले.
पोलिसांनी सांगितले की, बलात्काराची घटना १ जानेवारी ते १२ जून या कालावधीत वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये घडली. आरोपीने तिला अभ्यासाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केले. एवढेच नाही, तर दोघे अमेरिकेत असतानाही आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले होते.
advertisement
जीवे मारण्याची आणि खासगी फोटो लीक करण्याची धमकी
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला समजले की, आरोपी दुसऱ्या मुलीसोबत लग्नाबद्दल बोलत आहे. तिने याबाबत आरोपीला विचारणा केली असता, त्याने तिच्यावर हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तिचे खासगी फोटो लीक करण्याची धमकी देऊन तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला.
आईसोबत पोलीस ठाण्यात तक्रार
advertisement
या सर्व प्रकाराने निराश झालेल्या तरुणीने शेवटी आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तिने आपल्या आईसोबत वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
आरोपी मुलगा मुंबईतील लोअर परेल भागात राहणारा आहे, तर पीडित तरुणी माहिम येथील आहे. आरोपीचे वडील एका मोठ्या बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये घडलेल्या या घटनेने एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 1:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
अमेरिकेत PhD, स्टडीसाठी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये बोलवलं, बड्या अधिकाऱ्याच्या पोराचा तरुणीवर लैंगिक अत्याचार