चंद्रानंतर सूर्याकडे झेप; ISRO नं आदित्य -L1 बाबत दिली महत्त्वाची माहिती
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
आदित्य - एल वन असं त्या मोहिमेचं नाव आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊ या.
मुंबई, 31 ऑगस्ट : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने पाठवलेल्या चांद्रयान-3ने नुकतंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं. त्यामुळे अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला पहिला, चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथा देश बनला आहे. चांद्रयानाने पुढचं कार्यही अपेक्षेनुसार सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर भारताचं जगभर कौतुक होत आहे. चांद्रयान-3 यशस्वीरीत्या चंद्रावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सौरमोहिमेबद्दल सूतोवाच केलं होतं. 'इस्रो'ची ती महत्त्वाकांक्षी सौरमोहीम सुरू करण्यासाठी येत्या 2 सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आल्याचं समजतं. अद्याप त्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. आदित्य - एल वन असं त्या मोहिमेचं नाव आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊ या.
आदित्य एल वन या मोहिमेद्वारे सूर्याचा अभ्यास करण्यात येणार असून, सूर्य-पृथ्वी यंत्रणेतल्या एल वनभोवतीच्या हॅलो कक्षेत यान सोडलं जाणार आहे, असं 'इस्रो'च्या अधिकाऱ्याने सांगितलं. 'या यानाचं प्रक्षेपण दोन सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे,' असंही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
सौरमोहिमेची उद्दिष्टं :
- सूर्याच्या वातावरणाच्या वरच्या भागाचे (म्हणजेच क्रोमोस्फिअर आणि कोरोना) डायनॅमिक्स अभ्यासणं
advertisement
- क्रोमोस्फिअर आणि कोरोना या भागांमध्ये वाढत असलेल्या तापमानाचा अभ्यास करणं
- अंशतः आयनीभवन झालेल्या प्लाझ्माचा, तसंच सूर्याच्या वातावरणाच्या बाहेरच्या भागातून बाहेर येणाऱ्या ज्वाळा आणि अन्य बाबींचा अभ्यास करणं
- सूर्याच्या पार्टिकल डायनॅमिक्सचा अभ्यास करणं
या मोहिमेअंतर्गत पाठवलं जाणारं यान सूर्याच्या कोरोना या भागातली निरीक्षणं दुरून नोंदवेल. कोरोना म्हणजे सूर्याच्या वातावरणाचा सर्वांत बाह्य भाग. तसंच, पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल वन (सन-अर्थ लॅग्राजियन पॉइंट) या बिंदूपाशी असलेल्या सौर वाऱ्यांची इन-सिटू निरीक्षणंही या यानाच्या माध्यमातून नोंदवण्याचं उद्दिष्ट आहे.
advertisement
'इस्रो'च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही सौरमोहीम संपूर्ण स्वदेशी असेल. त्यात देशातल्या विविध संस्थांचा सहभाग असेल. त्या संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) आणि इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका, पुणे) या संस्थांचा समावेश आहे.
'व्हिजिबल इमिशन लाइन कोरोनाग्राफ पेलोड' आयआयए या संस्थेने विकसित केलं आहे. तसंच, सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड आयुका या संस्थेने विकसित केलं आहे.
advertisement
'इस्रो'ने दिलेल्या माहितीनुसार, 'आदित्य एल वन मोहिमेतल्या पेलोड्सच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती हाती लागणार आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणात उष्णता कशी वाढते, त्यातून काय बाहेर पडतं, ज्वाळा तयार होण्यापूर्वी आणि नंतर नेमकं काय घडत असतं, अंतराळातल्या हवामानात बदल कला होतो, इत्यादी अनेक प्रकारच्या माहितीचा त्यात समावेश आहे.'
advertisement
सूर्याच्या कोरोनो आणि क्रोमोस्फिअर या भागांमधली निरीक्षणं यूव्ही पेलोडच्या साह्याने नोंदवली जातील. तसंच, ज्वाळांची निरीक्षणं एक्स रे पेलोडच्या साह्याने नोंदवली जातील. एल वन भोवतीच्या हॅलो कक्षेत पोहोचणारे भारित कण आणि मॅग्नेटिक फिल्डबद्दलची माहिती पार्टिकल डिटेक्टर्स आणि मॅग्नेटोमीटर देऊ शकतील.
'या साऱ्यामुळे सूर्यावर चाललेल्या घटना-घडामोडींची निरीक्षणं नोंदवता येतील आणि त्याचा अंतराळातल्या वातावरणावर होणारा परिणाण रिअल टाइममध्ये अभ्यासता येणार आहे,' असं 'इस्रो'ने म्हटलं आहे.
advertisement
'आयुका'चे प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी सांगितलं, की आदित्य एल-वन या मोहिमेत यान पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरापर्यंत जाणार आहे. या यानात एकूण सात पेलोड्स म्हणजे उपकरणं असतील, असं 'आयुका'चे शास्त्रज्ञ प्रा. ए. एन. रामप्रकाश यांनी सांगितलं. सातपैकी चार पेलोड्स सूर्यावर नजर ठेवतील, तर तीन पेलोड्स परिस्थितीनुसार कण आणि मॅग्नेटिक फिल्डचा अभ्यास करतील.
advertisement
प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेमध्ये सूर्यावर कोणत्याही ग्रहणाशिवाय निरंतर लक्ष ठेवता येणार आहे. 2000 ते 4000 अँगस्ट्रॉम रेंजमधल्या यूव्ही किरणांचा अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे. या पातळीवर यूव्ही किरणांचा अभ्यास जगात आतापर्यंत करण्यात आलेलं नाही. चारही बाजूंच्या कक्षेमधून सूर्याचा अभ्यास करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Aug 31, 2023 11:55 AM IST





