पोलिसाच्या छातीला चावून पळाला, पण पुढच्याच क्षणी जिवाशी गेला, पुण्यात फरार तस्कराचा भयानक अंत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पसार असलेल्या एका कुख्यात तस्कराचा पुण्यात मृत्यू झाला आहे.
पुणे: अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पसार असलेल्या एका कुख्यात तस्कराचा पुण्यात मृत्यू झाला आहे. हा तस्कर मागील अनेक महिन्यांपासून फरार होता. मीरा भाईंदर पोलिसांचं विशेष पथक त्याच्या मागावर होतं. तो पुण्यातील कोंढवा परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मीरा भाईंदर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी आरोपी तस्कराने पोलिसांशी जोरदार झटापट केली.
या झटापटीनंतर त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या छातीचा चावा घेत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्याच क्षणात त्याचा मृत्यू झाला. झटापटीनंतर तो अचानक बेशुद्ध होऊन कोसळला. पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
नेमकी घटना काय?
अझीम अबू सालेम ऊर्फ अझीम भाऊ (वय ५१, रा. उरण) असं मृत पावलेल्या तस्कराचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या काशीगाव पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस' (अमली पदार्थ प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदर पोलीस त्याचा शोध घेत होते. तो आपली ओळख लपवून रत्नागिरी, कोल्हापूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.
advertisement
अखेर तो कोंढवा भागातील एका सोसायटीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मीरा भाईंदर पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रात्री पोलिसांनी अझीमच्या राहत्या घरावर छापा टाकला. आरोपीला ताब्यात घेताना त्याने पोलिसांशी जोरदार झटापट केली. यावेळी त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या छातीचा चावा घेऊन जखमी केले.
झटापट सुरू असतानाच अझीम अबू सालेम अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. पोलिसांनी त्याला त्वरित ससून रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अमली पदार्थ तस्कराच्या मृत्यूमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 19, 2025 11:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पोलिसाच्या छातीला चावून पळाला, पण पुढच्याच क्षणी जिवाशी गेला, पुण्यात फरार तस्कराचा भयानक अंत