'तिला' छेडणारा तरुण मृतावस्थेत सापडला; प्रेमीयुगुलावर 8 वर्षे चालला खटला अन् प्रकरणाचा वेगळाच शेवट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मृत व्यक्ती संबंधित तरुणीचा सतत पाठलाग करून तिला शारीरिक संबंधांसाठी धमकावत असे. या त्रासाला कंटाळून प्रेमी युगुलाने संगनमताने त्या व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता.
पुणे : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या व्यक्तीचा काटा काढल्याचा गंभीर ठपका असलेल्या एका प्रेमी युगुलाला तब्बल ८ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. पुराव्यांचा अभाव आणि तपासातील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन बारामती अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी या दोघांची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मृत व्यक्ती संबंधित तरुणीचा सतत पाठलाग करून तिला शारीरिक संबंधांसाठी धमकावत असे. या त्रासाला कंटाळून आणि प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी या प्रेमी युगुलाने संगनमताने त्या व्यक्तीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र न्यायालयात हा दावा टिकू शकला नाही.
advertisement
आरोपींच्या वतीने ॲड. ईब्राहिम शेख यांनी जोरदार युक्तिवाद करताना पोलिसांच्या तपासाचे वाभाडे काढले. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांनी सादर केलेले सर्व साक्षीदार हे मृताचे जवळचे नातेवाईक असल्याने त्यांचे जबाब संशयास्पद आहेत. तसेच, घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंवर आरोपींच्या रक्ताचे नमुने आढळले नाहीत आणि रासायनिक प्रयोगशाळेचा अहवालही सरकारी पक्षाच्या दाव्याशी सुसंगत नव्हता. ओळख परेडमध्येही अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या.
advertisement
न्यायालयाने हा सर्व युक्तिवाद ग्राह्य धरत स्पष्ट केले की, केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. ठोस पुराव्यांच्या अभावी या प्रेमी युगुलाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर या युगुलाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 10:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'तिला' छेडणारा तरुण मृतावस्थेत सापडला; प्रेमीयुगुलावर 8 वर्षे चालला खटला अन् प्रकरणाचा वेगळाच शेवट







