माजी सैनिकाने लोड केलेलं पिस्तूल मित्राच्या हाती दिलं अन्.... मध्यरात्री शिरुर हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परवानाधारक शस्त्राचा असा गैरवापर केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
सचिन तोडकर, प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून कायद्याचे उल्लंघन आणि बेजबाबदारपणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सविंदणे गावात रात्रीच्या शांततेत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या एका सेवानिवृत्त सैनिकासह मुंबईतील दाम्पत्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे एका माजी सैनिकाने आपले परवानाधारक शस्त्र दुसऱ्याच्या हाती दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
advertisement
शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुंबईतील भांडुप परिसरातून आपल्या मूळ गावी सविंदणे येथे आलेल्या लंघे दाम्पत्याने आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका सेवानिवृत्त सैनिकाने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परवानाधारक शस्त्राचा असा गैरवापर केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावळेराम लंघे आणि स्वाती राजेश लंघे (दोघे रा. भांडुप, मुंबई) हे आपल्या मूळ गावी सविंदणे येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आणि सेवानिवृत्त सैनिक विजय ज्योतिबा कसेकर हे देखील होते. रात्री साडेअकराच्या सुमारास राजेश लंघे यांच्या घरासमोर हा गोळीबाराचा प्रकार घडला. सेवानिवृत्त सैनिक विजय कसेकर यांनी स्वतःचे परवानाधारक पिस्तूल बेकायदेशीरपणे राजेश आणि स्वाती लंघे यांच्याकडे सोपवले. इतकेच नाही, तर त्यांनी ते पिस्तूल 'लोड' करून दिले. त्यानंतर परवाना नसतानाही या दाम्पत्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हवेत गोळीबार केला.
advertisement
परिसरात खळबळ
गोळीबाराचा आवाज येताच परिसरात खळबळ उडाली. शिरूर पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू केली. तपासाअंती असे निष्पन्न झाले की, केवळ मौजमजेसाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद ज्ञानदेव खटिंग यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.
शिरूर पोलिसांनी या प्रकरणी सेवानिवृत्त सैनिक विजय कसेकर, राजेश लंघे आणि स्वाती लंघे यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या जबाबदार माजी सैनिकाने आपले शस्त्र दुसऱ्याच्या हातात देणे, हे कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. या घटनेमुळे सविंदणे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 9:33 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
माजी सैनिकाने लोड केलेलं पिस्तूल मित्राच्या हाती दिलं अन्.... मध्यरात्री शिरुर हादरलं







