MHADA Pune lottery : अखेर घराचं स्वप्न पूर्ण होणार, पुण्यातील म्हाडाच्या 4186 घरांची सोडत, तारीख आली समोर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पुण्यात आपले हक्काचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेली म्हाडा घरांची सोडत अखेर काढण्यात येणार आहे.
पुणे: पुण्यात आपले हक्काचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेली म्हाडा घरांची सोडत अखेर काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या पुणे विभागातील एकूण 4 हजार 186 सदनिकांची सोडत उद्या 10 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता काढली जाणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात ही सोडत होणार असून, म्हाडा घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे.
म्हाडाच्या या 4 हजार 186 घरांसाठी तब्बल 2 लाख 15 हजार 965 नागरिकांनी अर्ज केले आहेत. पुणे मंडळाकडून या घरांच्या सोडतीची जाहिरात मागील वर्षी 11 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील घरे समाविष्ट आहेत. यामध्ये 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 3 हजार 322 सदनिका आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे.
advertisement
म्हाडाकडून दोन वेळा मुदतवाढ
अर्जदारांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन म्हाडाकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने घरांची सोडत पुढे ढकलण्यात आली. सुरुवातीला डिसेंबरमध्ये सोडत होण्याची शक्यता होती. मात्र, महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने हा निर्णय रखडला. सोडत घेण्यासाठी म्हाडाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. मात्र, यामुळे मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असे सांगत आयोगाने परवानगी नाकारली. अखेर जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर येत्या मंगळवारी ही सोडत होणार आहे.
advertisement
अखेर प्रतीक्षा संपली
म्हाडा घरांच्या सोडतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या सोडतीसाठी 2 लाख 15 हजार 965 जणांनी अर्ज केले असून, अनामत रकमेच्या स्वरूपात सुमारे 488 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. सप्टेंबर 2025 पासून ही रक्कम म्हाडाकडेच अडकून असल्याने, सोडत नेमकी कधी होणार, याबाबत अर्जदारांकडून वारंवार विचारणा केली जात होती.
advertisement
घरबसल्या पाहा निकालाचे थेट प्रक्षेपण
अर्जदारांची गर्दी टाळण्यासाठी म्हाडाकडून सोडतीचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अर्जदारांना ही सोडत घरबसल्या पाहता येणार असून, दुपारी 12 वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सोडत थेट दाखवली जाणार आहे. यासोबतच पात्र अर्जदारांना निकाल पाहण्यासाठीची लिंक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठवण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता आणि तांत्रिक अडचणींमुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर प्रतीक्षा संपली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
MHADA Pune lottery : अखेर घराचं स्वप्न पूर्ण होणार, पुण्यातील म्हाडाच्या 4186 घरांची सोडत, तारीख आली समोर









