9 सप्टेंबरला लंडनला गेलो, मग 17 ला गोळीबार कसा झाला? घायवळचा याचिकेत मोठा खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Nilesh Ghaiwal News: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळने मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. यात त्याने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यात गुंड निलेश घायवळचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागात एका टोळक्याने एका तरुणावर गोळीबार केला होता. तर दुसऱ्यावर चाकुने वार केले होते. हे हल्लेखोर निलेश घायवळ टोळीचे असल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी घायवळ टोळीचा बिमोड करण्यासाठी पावलं उचलली. पोलिसांनी निलेश घायवळच्या घरी छापेमारी करत कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
कोथरुड गोळीबार प्रकरण घडल्यापासून खूनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे, खंडणी वसूल करणे, अशा विविध गुन्ह्यासाठी निलेश घायवळवर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. सध्या निलेश घायवळ परदेशात आहे. मात्र त्याने वकिलांमार्फत कोर्टात रिट पिटीशन दाखल केली आहे. या पिटीशनमध्ये त्याने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण कुठलीही टोळी चालवत नसल्याचा दावाही त्याने याचिकेत केला आहे. याबाबत आज मुंबई हायकोर्टात यावर सुनावणी होणार आहे.
advertisement
निलेश घायवळने याचिकेत काय म्हटलं?
निलेश घायवळने याचिकेत म्हटलं की, मी कुठलीही टोळी चालवत नाही. कोथरुड गोळीबारात पुणे पोलिसांनी मीडिया ट्रायलच्या दबावातून माझं नाव घेतलं. मी ९ सप्टेंबरला परदेशात गेलो होते. मी परदेशात गेल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच १७ तारखेला गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे कोथरुड गोळीबार प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाही."
advertisement
"पुणे पोलिसांनी केवळ मला त्रास देण्यासाठी बनावट गुन्हा दाखल केला आहे. चुकीच्या पद्धतीने मला टोळीप्रमुख दाखवलं. तसेच पोलिसांनी माझ्या कुटुंबीयांना धमकावलं. एवढंच नव्हे तर कुठलंही सर्च वॉरंट नसताना पोलिसांनी घरात घुसून घराची झडती घेतली. मी कुठलीही टोळी चालवत नाही," असंही घायवळ याचिकेत म्हणाला. आज यावर सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2025 11:56 AM IST