पुण्याचा 'तेजस' गुजरातमध्ये हरपला! 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची आस ठरली शेवटची; मांजरीतील 3 मित्रांचा हृदयद्रावक शेवट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
श्रद्धेपोटी बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या तीन जिवाभावाच्या मित्रांचा गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला
पुणे : पुण्यातील मांजरी परिसरावर शोककळा पसरली आहे. श्रद्धेपोटी बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या तीन जिवाभावाच्या मित्रांचा गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा येथे इंदूर-अहमदाबाद महामार्गावर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.
भक्तीचा प्रवास ठरला शेवटचा
मांजरी बुद्रुक येथील तेजस देविदास दगडे (२६), अभिषेक यादव (२६) आणि सचिन बिरादार (२७) हे तिघे मित्र गेल्या १८ दिवसांपूर्वी घरून आनंदाने देवदर्शनासाठी निघाले होते. बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन ही मित्रमंडळी आपल्या घराकडे, पुण्याकडे परततील अशी आशा कुटुंबीयांना होती. मात्र, गुजरातच्या धाधेला वळणावर नियतीने घात केला. त्यांची सुसाट कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर जोरात आदळली.
advertisement
अपघाताचा भीषण थरार
हा अपघात इतका भयानक होता की, धडकेमुळे कारचे इंजिन तुटून थेट शेतात फेकले गेले. गाडी दुभाजकाला धडकून उलटली आणि रस्त्यापासून सुमारे २० फूट खोल शेतात कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. ज्या घरात देवदर्शनाहून मुलं परत येतील म्हणून तयारी सुरू होती, तिथे त्यांच्या निधनाची बातमी धडकली आणि एकच आक्रोश झाला.
advertisement
एक स्वप्नवत आयुष्य अधुरेच
मृत तेजस दगडे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हुशार तरुण होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर (निवृत्त पोलीस उपनिरीक्षक) तो मांजरीमध्ये मंगल कार्यालयाचा व्यवसाय सांभाळून आपल्या कुटुंबाला आधार देत होता. अत्यंत मनमिळावू आणि लाघवी स्वभावाच्या तेजसच्या जाण्याने दगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुण्याच्या मांजरी स्मशानभूमीत जड अंतःकरणाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भक्तीचा हा प्रवास असा अर्धवट संपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 1:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याचा 'तेजस' गुजरातमध्ये हरपला! 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची आस ठरली शेवटची; मांजरीतील 3 मित्रांचा हृदयद्रावक शेवट







