अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; मदतीसाठी दरवाजा उघडताच समोर आलं भलतंच कांड, कारमध्ये नेमकं काय होतं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वरवर पाहता हा रस्ते अपघात वाटत होता, मात्र पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी जेव्हा कारची झडती घेतली, तेव्हा समोर आलेल्या दृश्याने सगळेच चक्रावले.
पुणे : अष्टविनायक महामार्गावर गुरुवारी दुपारी दोन कारचा भीषण अपघात झाला. वरवर पाहता हा रस्ते अपघात वाटत होता, मात्र पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी जेव्हा कारची झडती घेतली, तेव्हा समोर आलेल्या दृश्याने सगळेच चक्रावले. अपघाताच्या निमिताने चक्क दिवसाढवळ्या सुरू असलेल्या मोठ्या दारू तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.
नेमकी घटना काय?
मलठण (ता. शिरूर) येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास एका इनोव्हा (MH 12 VB 500) आणि आय-२० (MH 12 GF 1606) कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. इनोव्हामधील ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र, खरा थरार आय-२० कारपाशी सुरू होता.
मद्यधुंद चालक आणि 'ती' १५ कॅन!
अपघातानंतर आय-२० कारचा चालक अनिल चंदया चौहाण (रा. लोणी काळभोर) हा मद्यधुंद अवस्थेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जेव्हा पोलिसांनी कारची तपासणी केली, तेव्हा आतमध्ये ३० लिटर क्षमतेचे तब्बल १५ कॅन आढळले. या कॅनमध्ये ४५० लिटर तयार हातभट्टीची दारू भरलेली होती.
advertisement
राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असताना, भरदिवसा महामार्गावरून इतक्या मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस डोळे झाकून आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आरोपी अनिल चौहाण हा पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने घटनास्थळी जमावाने त्याला चांगलाच चोप दिल्याचीही चर्चा आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल आणि वाहन जप्त केले असून शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 8:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; मदतीसाठी दरवाजा उघडताच समोर आलं भलतंच कांड, कारमध्ये नेमकं काय होतं?










