'तुझ्या घरचं खातो का? वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणं पुण्याच्या तरुणाला भोवलं, आता हात जोडून म्हणतोय...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वारजे परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांवर धावून जाणं आणि त्यांना धमकावणं या दोन तरुणांना चांगलेच महागात पडलं आहे.
पुणे : 'तुझ्या घरचं खातो का? आमच्याशी नीट बोलायचं,' अशा अरेरावीच्या भाषेत वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोन तरुणांना कायद्याचा इंगा दाखवण्यात आला आहे. वारजे परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांवर धावून जाणं आणि त्यांना धमकावणं या दोन तरुणांना चांगलेच महागात पडलं आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
काळ्या काचांमुळे अडवली गाडी
याबाबत वाहतूक विभाग प्रमुख पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे यांनी माहिती दिली. वारजे उड्डाणपुलाजवळ कात्रजकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर वाहतूक कर्मचारी दत्ता मरगळे आणि राहुल कदम हे आपली ड्युटी करत होते. यावेळी एका मारुती 800 गाडीच्या (एमएच 12 बीजी 8867) सर्व काचांना ब्लॅक फिल्म लावलेली असल्यानं पोलिसांनी ती गाडी बाजूला घेण्यास सांगितलं.
advertisement
गाडी बाजूला न घेता, गाडीतील रेहान रशीद शेख आणि बाबा रफीक शेख (दोघेही, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) या तरुणांनी पोलिसांना अरेरावी सुरू केली. 'गाडी बाजूला घ्यायला कशाला सांगतोस?' असं विचारून त्यांनी पोलिसांवर ओरडण्याचा आणि हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर त्यांनी ब्लॅक फिल्म प्रकरणी असलेला नियमित वाहतूक दंड भरण्यासही नकार दिला.
advertisement
माफी मागण्याचा व्हिडीओ व्हायरल
view commentsया प्रकारानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवल्यानंतर याच दोन तरुणांनी हात जोडून पोलिसांची माफी मागितल्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील कडक भूमिकेचे कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 04, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'तुझ्या घरचं खातो का? वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालणं पुण्याच्या तरुणाला भोवलं, आता हात जोडून म्हणतोय...


