Pune News: ढोल-ताशांचा गजर अन् कोट्यवधींचं अर्थकारण, गणेशोत्सवात होते 50000000 रुपयांची उलाढाल
- Published by:
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Dhol-Tasha Pathak: गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ढोल-ताशा पथकांची क्रेझ खूप वाढली आहे. ही पथकं भक्कम अर्थकारण आणि रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोत ठरत आहेत.
पुणे: गणेशोत्सव हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गणेशोत्सवात पुणे शहरातील रस्त्यांवर, गल्लीबोळांत, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गगनभेदी ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण वातावरण भारलेलं असतं. पण, या आवाजामागे केवळ सांस्कृतिक उत्साह नाही, तर एक भक्कम अर्थकारण आणि रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोतही आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दरवर्षी ढोल-ताशा पथकांमधून सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती युवा वाद्य पथक ट्रस्टचे अध्यक्ष, ॲड. अनिश पाडेकर यांनी दिली आहे.
सामान्यपणे एका ढोल पथकामध्ये ढोल, ताशा, झांज, भेरी, लेझीम यांचा समावेश असतो. गेल्या दोन दशकांपासून पुण्यात ही परंपरा अधिकाधिक विस्तारत चालली आहे. गणपती उत्सवाच्या काळात शहरात 170 ते 200 हून अधिक ढोल-ताशा पथकं सक्रिय असतात.
advertisement
एक मिरवणूक अन् लाखो रुपयांचा खर्च
प्रत्येक पथकाच्या खर्चाचा एक स्वतंत्र आराखडा असतो. एका मोठ्या मिरवणुकीसाठी किमान 35 ते 40 हजार रुपये खर्च असतो. काही पथकांचा हा खर्च सव्वा ते दीड लाख रुपये इतका होतो. या खर्चामध्ये जागेचं भाडं, वाद्यांची देखभाल, ढोल-ताशांची खरेदी व देखरेख, कलाकारांचा गणवेश, वाहनांची वाहतूक व्यवस्था, जेसीबी व मांडव यांची भाड्याने ने-आण या सर्व घटकांचा समावेश होतो.
advertisement
रोजगार निर्मिती
या पथकांमधून केवळ वादकांनाच नव्हे तर 15 पेक्षा अधिक क्षेत्रांतील लोकांना रोजगार मिळतो. वाद्यनिर्माते व विक्रेते, ड्रेस डिझायनर व टेलर, वाहन चालक व जेसीबी ऑपरेटर, मांडव व लायटिंग व्यावसायिक, व्हिडिओग्राफर व छायाचित्रकार, सोशल मीडिया मॅनेजर, इन्फ्लूएन्सर्स इत्यादींचा त्यामध्ये समावेश होतो.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ढोल-ताशा पथकांची क्रेझ खूप वाढली आहे. मिरवणुकांमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामुळे पथकांची ब्रँड व्हॅल्यू आणि कमाई दोन्ही वाढते. काही पथकांना तर विविध कॉर्पोरेट प्रायोजक देखील मिळतात. हे प्रायोजक आपला ब्रँड प्रमोट करण्यासाठी गणपती मिरवणुकांचा वापर करतात.
advertisement
सामाजिक भान
ही ढोल-ताशा पथकं केवळ व्यावसायिक दृष्टिकोन नव्हे तर सांस्कृतिक वारसाही जपतात. तरुण पिढीमध्ये संघभावना, शिस्त, संयम व सहकार्य या मूल्यांचं रोपण ढोल-ताशा पथकांतून होतं. त्यामुळे ही परंपरा केवळ संगीताची नव्हे, तर समाजाला जोडणारीही ठरते.
ढोल-ताशा पथकं ही आता केवळ उत्सवापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. ती संस्कृती, व्यवसाय, रोजगार, आणि सोशल मीडिया इमेज या सर्वच क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गणेशोत्सवात वाजणाऱ्या ढोल-ताशांचा नाद आता पुण्याचं आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैभव बनला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 30, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: ढोल-ताशांचा गजर अन् कोट्यवधींचं अर्थकारण, गणेशोत्सवात होते 50000000 रुपयांची उलाढाल