'...तुझ्यामुळे तुरुंगात गेलो', पुण्यात सराईत गुंडांकडून तरुणावर कोयत्याने वार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणावर दोन जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणावर दोन जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी डोक्यात कोयता घालू का? असं विचारत हा हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी आरोपींनी पीडित तरुणाच्या अन्य एका मित्राला देखील मारहाण केली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोन्या उर्फ विष्णू लक्ष्मण होसमणी (वय 23, रा. इंदिरानगर, खडडा, गुलटेकडी) असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर भिमराव नरसप्पा मानपाढे (वय 26, रा. गुलाबनगर, धनकवडी, पुणे-37) आणि लखन वाघमारे (वय 30, रा. अप्पर बिबवेवाडी, पुणे-37) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मानपाढे आणि वाघमारे यांनी कारमधून येत विष्णूवर हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी घडलेल्या एका गुन्ह्याच्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. त्यावेळी आरोपी मानपाढे आणि वाघमारे यांनी पीडित होसमणी याला लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी होसमणी याने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दोन्ही आरोपींना तुरुंगवारी घडली होती. अलीकडेच त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर येताच आरोपींनी पुन्हा एकदा होसमणी याला टार्गेट केलं.
advertisement
“तू आमची तक्रार केली , तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं,” असं म्हणत आरोपींनी कोयत्याने वार केले आहेत. घटनेच्या वेळी फिर्यादी आणि त्याचा मित्र स्वारगेट परिसरात एकेठिकाणी थांबले होते. यावेळी दोन्ही आरोपी चारचाकी गाडीतून तिथे आले. फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुक्की करायला सुरुवात केली. फिर्यादीने विरोध करताच दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पीडिताचा मित्र कृष्णा विजय सोनकांबळे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्यालाही मारहाण केली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 23, 2025 2:05 PM IST


