उन्ह तापलं, विठुरायासाठी खास म्हैसुरी चंदनाचा लेप, कशी असते चंदन-उटी पूजा?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Vitthal Rukmini Puja: उन्हाळा सुरू झाला की विठ्ठल-रुक्मिणी मातेची चंदन उटी पूजा केली जाते. त्यासाठी खास म्हैसूरहून चंदन मागवण्यात आले आहे.
पंढरपूर - उन्हाळ्यात पांडुरंगाला थंडावा मिळावा, यासाठी चंदनाचा लेप लावण्यास सुरुवात झालीये. चंदन-उटी पूजेसाठी म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही या पद्धतीने चंदन-उटी लावण्यात येत आहे. दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रात पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदन-उटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली.
उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो. उष्णतेचा मनुष्य आणि प्राणी मात्राला जसा त्रास होतो. तसाच देवांनाही होतो, अशी धारणा भक्तांमध्ये असते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचेही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा, यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते. ही परंपरा कित्येक शतकांपासून मंदिरात चालू आहे.
advertisement
'राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रूळे माळ कंठी वैजयंती', अशा शब्दांत संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचे वर्णन केले आहे. पाडव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येत असून ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे.
advertisement
कशी असते चंदन-उटी पूजा?
दर वर्षी गुढी पाडवा ते मृग नक्षत्रपर्यंत दररोज दुपारी चार वाजता चंदन उटी पूजा केली जाते. चंदन हे अतिशय सुगंधी, शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठुरायाला शीतलता वाटावी, यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो. सध्या दररोज दीड किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या सर्वांगाला लेप लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच देवाचे सुंदर रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर असतात.
advertisement
असा असतो नैवद्य
चंदन उटी पूजेनंतर देवाला शिरा, पोहे, सुका मेवा कैरीच पन्हे आणि थंड लिंबू सरबत असा खास नैवद्य ही दाखवला जातो. चंदन उटी पूजेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कर्नाटकामधील बंगळुरू, म्हैसूर येथून उच्च प्रतीचे सुंगधी 400 किलो चंदन खरेदी केले आहे. पूजेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाला लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे देवाचे रुप सुवर्णालंकारा पेक्षाही उठून दिसते. म्हणूनच अनेक भाविकांना चंदन उटी पूजा करून समाधान मिळते, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
advertisement
बुकींग फुल्ल
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची चंदन उटी पूजेचे 2 महिन्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेसाठी 21 हजार रुपये, तर रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेसाठी 9 हजार रुपये देणगी शुल्क आकारले जाते.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
April 03, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
उन्ह तापलं, विठुरायासाठी खास म्हैसुरी चंदनाचा लेप, कशी असते चंदन-उटी पूजा?