अयोध्येत श्रीरामाची मूर्ती बनवणारे मूर्तिकार कोण आहेत? शिल्पकाराचं आहे 'केदारनाथ कनेक्शन'
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Ram Mandir: म्हैसूरचे अरुण योगीराज शिल्पी यांनी रामलल्लाच्या मूर्तीचे काम पूर्ण केलं आहे. कार्यक्रमाच्या चार दिवस आधी मंदिरात तिची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : एकीकडे अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे म्हैसूरचे अरुण योगीराज शिल्पी यांनी रामलल्लाच्या मूर्तीचे काम पूर्ण केलं आहे. कार्यक्रमाच्या चार दिवस आधी मंदिरात तिची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे. अरुण हे देशातल्या त्या तीन शिल्पकारांपैकी एक होते, ज्यांना रामलल्लाची मूर्ती बनवण्याचं काम देण्यात आलं होतं. याशिवाय बेंगळुरूचे जीएल भट्ट आणि राजस्थानचे सत्यनारायण पांडे यांच्याकडेही रामलल्लाच्या मूर्ती बनवण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. 'डेक्कन हेराल्ड'च्या वृत्तानुसार, अरुण म्हणाले, 'रामलल्लाची मूर्ती पूर्ण करण्यासाठी सहा महिने लागले. या मूर्तीची उंची पायापासून कपाळापर्यंत 51 इंच लांब आहे.'
अरुण योगीराज शिल्पी म्हणाले, 'प्रभावळीसह संपूर्ण मूर्ती आठ फुटांपेक्षा जास्त उंच आणि साडेतीन फूट रुंद आहे. धनुष्यबाण घेतलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात ही श्रीरामाची मूर्ती आहे. तीन मूर्तींपैकी एक मूर्ती अयोध्येतल्या राम मंदिरात अंतिम स्थापनेसाठी निवडली जाईल.' अरुण यांनी केलेली ही मूर्ती राम मंदिरात बसवण्यासाठी निवडली गेली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारी अरुण यांची ही तिसरी मूर्ती असेल. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी केदारनाथमध्ये स्थापित श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचं आणि दिल्लीतल्या कर्तव्यपथावर स्थापन करण्यात आलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं.
advertisement
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 2,000 मान्यवरांपैकी अरुण योगीराज शिल्पी हे एक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनवण्याचा आदेश न्याय विभागाकडून मिळाल्याचेही अरुण यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा दिल्लीतल्या जैसलमेर हाउसमध्ये बसवण्यात येणार आहे. त्यांनी त्यावर काम सुरू केलं असून, फेब्रुवारीअखेर काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
अरुण योगीराज शिल्पी यांनी सांगितलं, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते केलं जाईल, अशी शक्यता आहे. पाचव्या पिढीचे मूर्तिकार 40 वर्षीय अरुण यांनी एमबीए केलं आहे. त्यांनी 2008मध्ये मूर्ती बनवण्याची कौटुंबिक परंपरा कायम ठेवण्यासाठी आपली कॉर्पोरेट नोकरी सोडली होती. आतापर्यंत त्यांनी 1,000 हून अधिक मूर्ती बनवल्या आहेत. मूर्तिकलेचा वंशपरंपरागत वारसा त्यांनी जपला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2023 1:04 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
अयोध्येत श्रीरामाची मूर्ती बनवणारे मूर्तिकार कोण आहेत? शिल्पकाराचं आहे 'केदारनाथ कनेक्शन'