नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी का फुंकतात घागरी? पाहा काय आहे महत्त्व Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी घांगरी फुंकणे ही प्रथा आहे.
डोंबिवली, 5 ऑक्टोबर : अवघ्या काही दिवसांवर नवरात्र उत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्र उत्सवात देखील अनेक प्रथा परंपरा मानल्या जातात. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी घांगरी फुंकणे ही प्रथा आहे. अपप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी देवीला विविध रूपे घ्यावी लागली. यापैकीच एक रूप म्हणजे महालक्ष्मी. महालक्ष्मी पुढे या घागरी फुंकल्या जातात. यावेळी देवीच्या आरत्या आणि जोगवा मागून देवीचा किंवा शक्तीचा जागर केला जातो. यासंदर्भात डोंबिवलीतील प्रवोचनकर अलका मुतालिक आणि माजी शिक्षिका सुलभा मूळे यांनी माहिती दिली आहे.
का फुंकतात घागरी?
शक्ती आणि ज्ञानाचे जागरण करणारा उत्सव म्हणजेच नवरात्र उत्सव. या उत्सवात प्रामुख्याने देवीची उपासना केली जाते. ही आदिशक्ती परब्रह्म किंवा परमात्म्याची शक्ती आहे. ज्यावेळी समाजात अपप्रवृत्ती वाढीस लागली त्यावेळी या अपप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी देवीने रूप घेतले. देवीच्या याच रुपाला नवरात्र उत्सवात पुजले जाते. घागरी फुंकणारी एक जलदेवता आहे. त्यामुळे घागरी फुंकणे हे तिचे प्रतीक मानले जाते.
advertisement
घागर फूंकण्याने मूलाधार चक्र होते जागृत
घागर हे एक जल कुंभाचे प्रतीक आहे. जल कुंभ हे लक्ष्मीच्या हातातील एक वस्तू. या घागरीची पूजा देखील लक्ष्मीचे प्रतीक म्हणून केले जाते. घागरी फुंकताना आपण आपला श्वास अत्यंत वेगाने बाहेर टाकतो. ज्यावेळी श्वास बाहेर टाकतो तो घेण्याची प्रक्रिया होत नाही त्यामुळे कळत नकळत नाभीवर परिणाम होतो. याचवेळी मूलाधार चक्राच्या ठिकाणी असलेलं ज्ञान आणि शक्ती जागृत होण्यास मदत होते. याच शक्तीचा जागर नवरात्रात केला जातो,अशी माहिती प्रवोचनकर अलका मुतालिक यांनी दिली.
advertisement
घागर फुंकणे हे एक व्रत
घागर फुंकणे ही प्रथा काही जाती जमातीमध्ये आहे. लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्ष हे व्रत केले जाते. यामध्ये सात खडे आणि धाग्याची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर लग्नाला किती वर्ष झाली आहेत तेवढ्या गाठी या धाग्याला बांधाव्या लागतात. त्यानंतर पूजा झाल्यावर ते विसर्जन करतात. सात खडे म्हणजे सात आसरा असतात अशी समजूत असल्याची माहिती सुलभा मुळे यांनी दिली.
advertisement
अशी फुंकतात घागर
देवीपुढे घागरी फुंकण्याच्याआधी विस्तवावर धूप जाळून होणाऱ्या धुरावर, उपडी घागर धरून त्यात धूर भरला जातो. नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारीत, ती घागर नाचवित देवीपुढे नृत्य केले जाते, फेर धरला जातो. प्रत्येकीने किमान पाच वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 05, 2023 4:51 PM IST