Explainer : आता सोयाबीनच ठरणार शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर! दरात सुधारणा, मार्केटची पुढील दिशा काय असणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soybean Market : देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी बाजारातील दर अजूनही हमीभावापेक्षा कमीच आहेत. मात्र, महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपासून हमीभावाने खरेदी सुरू होणार आहे.
मुंबई : देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असले तरी बाजारातील दर अजूनही हमीभावापेक्षा कमीच आहेत. मात्र, महाराष्ट्रात १५ नोव्हेंबरपासून हमीभावाने खरेदी सुरू होणार असून, मध्य प्रदेशातील भावांतर योजनेअंतर्गत खरेदी पूर्ण झाल्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत दराला स्थिरता आणि सुधारणा मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
उत्पादन घटले, पण दर वाढले नाहीत
यंदा देशभरात सोयाबीनची लागवड मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली होती. शिवाय अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी, उत्पादन घटले आणि गुणवत्ताही कमी झाली. तरीसुद्धा बाजारात सोयाबीनचा दर हमीभाव ५,३२८ रुपयांपेक्षा कमी, म्हणजेच ३,९०० ते ४,१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. दुसरीकडे प्रक्रिया उद्योगांकडून खरेदीचे दर ४,६५० ते ४,७५० रुपये प्रति क्विंटल इतके आहेत, मात्र गुणवत्ता कमी असल्याने सर्वच शेतकऱ्यांना तो दर मिळत नाही.
advertisement
गुणवत्तेच्या तफावतीमुळे बाजार अस्थिर
व्यापाऱ्यांच्या मते, बाजारात येणाऱ्या मालात कमी गुणवत्तेच्या सोयाबीनचे प्रमाण अधिक असल्याने सरासरी दर खाली येत आहेत. यामुळे प्रक्रिया प्लांट्स आणि बाजारभावातील फरक ३०० ते ४०० रुपयांपर्यंत वाढला आहे. काही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे की हा “कमी गुणवत्तेचा माल” मुद्दा काही प्रमाणात दर नियंत्रणाची युक्ती असू शकते, मात्र यावर अंतिम निर्णय शेतकरीच घेऊ शकतात.
advertisement
उत्पादन १६ ते २० टक्क्यांनी घटले
काढणी पूर्ण झाल्यानंतर आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात १६ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. सोया प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) च्या अंदाजानुसार, यंदा उत्पादन १०५ लाख टनांपर्यंत राहील. तर व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांच्या मते, उत्पादन ९५ ते १०० लाख टनांदरम्यान असेल. म्हणजेच, सर्वांच्या अंदाजात यंदा उत्पादन घट स्पष्ट दिसते.
advertisement
दरवाढीची शक्यता
मध्य प्रदेशात भावांतर योजनेतून विक्री वेगाने सुरू आहे, त्यामुळे बाजारात आवक वाढलेली आहे. मात्र, ही खरेदी संपल्यानंतर आणि महाराष्ट्रात हमीभावाने खरेदी सुरु झाल्यानंतर बाजारातील पुरवठा कमी होईल, याचा थेट परिणाम दरवाढीच्या स्वरूपात दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा दर ५,००० रुपयांच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजाराचाही प्रभाव
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तडजोडींमुळे जागतिक बाजारात सुधारणा दिसत आहे. त्यामुळे भारतीय सोयाबीनचे दरही त्याचा परिणाम अनुभवत आहेत.
advertisement
तसेच, यंदा पावसामुळे बियाण्याच्या दर्जाचे सोयाबीन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे बियाणे सोयाबीनला ५,००० ते ५,३०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. काही बियाणे कंपन्यांनी याची थेट खरेदीही सुरू केली आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात अशा दर्जेदार सोयाबीनची मागणी वाढेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे दर्जाचे सोयाबीन साठवून ठेवून योग्य वेळी विकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 1:17 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Explainer : आता सोयाबीनच ठरणार शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर! दरात सुधारणा, मार्केटची पुढील दिशा काय असणार?


