ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पहाटे घरावर फेकले पेट्रोल बॉम्ब
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भंडारा जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भंडारा: भंडारा जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहापूर ग्रामपंचायत येथील सदस्य सचिन गाडेकर यांच्या घरावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला केला. या भीषण हल्ल्यात गाडेकर यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चार दुचाकी आणि एक कार जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. यावेळी गाडेकर कुटुंब गाढ झोपेत होते. अज्ञात हल्लेखोरांनी नियोजित कट रचून सचिन गाडेकर यांच्या घराच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकले. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले आणि घराच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांना आपल्या विळख्यात घेतले. सुदैवाने, आगीचा भडका उडताच कुटुंबातील सदस्यांना जाग आली आणि त्यांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित बाहेर पळ काढला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
advertisement
पाच वाहने जळून खाक
या आगीत घरासमोर पार्क केलेल्या चार दुचाकी आणि एक चारचाकी कार पूर्णपणे जळून खाक झाली. आगीमुळे घराच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
राजकीय वैमनस्यातून हल्ला?
"हा केवळ वाहने जाळण्याचा प्रयत्न नव्हता, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्याचा कट होता," असा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद किंवा राजकीय वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पहाटे घरावर हल्ला करणारे आरोपी नक्की कोण होते? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 2:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पहाटे घरावर फेकले पेट्रोल बॉम्ब







