मावळातल्या शेतकऱ्याचे 'टॉप सिक्रेट' गुलाब थेट लंडनला, किती मिळणार पैसे? आकडा ऐकून तुम्ही व्हाल थक्क
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मावळ तालुक्यातील दिलीप काळे यांनी फुलशेतीतून बक्कळ कमाई केली आहे.
पुणे : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मावळ तालुक्यातील दिलीप काळे यांनी फुलशेतीतून बक्कळ कमाई केली आहे. विशेषतः व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या लाल गुलाबांना परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली असून, यंदा तब्बल ७० लाख फुलांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट त्यांनी गाठले आहे.
परदेशात २५-३० रुपये, देशात १८-२० रुपये भाव
दिलीप काळे यांनी लागवड केलेल्या दर्जेदार लाल गुलाबांना परदेशात एका फुलाला २५ ते ३० रुपयांपर्यंत भाव मिळतो, तर देशांतर्गत बाजारात हेच फूल १८ ते २० रुपयांना विकले जाते. उत्कृष्ट दर्जा, लांब देठ आणि टिकाऊपणा यामुळे युरोपसह गल्फ देश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये त्यांच्या फुलांना विशेष मागणी आहे.
advertisement
‘टॉप सिक्रेट’ जातीची लागवड
काळे यांनी ‘टॉप सिक्रेट’ या उच्च दर्जाच्या गुलाब जातीची लागवड केली आहे. ही जात उत्पादनक्षम असून फुलांचा आकार, रंग आणि टिकाऊपणा यामुळे बाजारात वेगळी ओळख निर्माण करते. विशेषतः लाल गुलाबांना व्हॅलेंटाइन डेच्या काळात प्रचंड मागणी असते, तर इतर रंगांच्या फुलांना तुलनेने कमी मागणी असल्याचे ते सांगतात. तरीही त्यांच्या शेतात लाल, पांढरे, गुलाबी आणि पिवळ्या गुलाबांची लागवड केली जाते.
advertisement
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
फुलांची गुणवत्ता टिकवण्यासाठी काळे यांनी शेतात कोल्ड स्टोअरेजची सुविधा उभारली आहे. काढणीनंतर फुलांचे वर्गीकरण करून शितपेट्यांमधून (कोल्ड चेन) त्यांची निर्यात केली जाते. या प्रक्रियेमुळे फुले १५ ते १८ दिवस टवटवीत राहतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेळेवर आणि ताज्या अवस्थेत माल पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होत आहे.
advertisement
मावळमधून १ कोटीहून अधिक फुलांची वाहतूक
मावळ तालुक्यातून यंदा देशांतर्गत आणि परदेशात मिळून १ कोटीहून अधिक फुलांची निर्यात व विक्री होणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात दररोज होणारी फुलांची उलाढाल वेगळीच आहे. मात्र व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मावळातील लाल गुलाबांना सर्वाधिक मागणी मिळत असल्याचे चित्र आहे.
४ ते ५ कोटींची उलाढाल
दर्जेदार उत्पादन, योग्य नियोजन आणि बाजारपेठेची अचूक ओळख यामुळे दिलीप काळे यांच्या फुलशेतीतून यंदा ४ ते ५ कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. पारंपरिक पिकांपेक्षा फुलशेती अधिक फायदेशीर ठरत असल्याचे ते सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 11:48 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
मावळातल्या शेतकऱ्याचे 'टॉप सिक्रेट' गुलाब थेट लंडनला, किती मिळणार पैसे? आकडा ऐकून तुम्ही व्हाल थक्क








