आईचं कॅन्सरने निधन तरी हार मानली नाही, साताऱ्याच्या गुरुदत्तची शेती पोहोचली परदेशात, करतोय लाखोंची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : आईच्या निधनाने खचलेला मुलगा आज सेंद्रिय शेतीचा प्रेरणादायी चेहरा बनला आहे.
सातारा : आईच्या निधनाने खचलेला मुलगा आज सेंद्रिय शेतीचा प्रेरणादायी चेहरा बनला आहे. जावळी तालुक्याच्या विवर गावातील गुरुदत्त संपत पार्टे याची कहाणी ही जिद्द, संघर्ष आणि बदलाची आहे.
आईच्या निधनानंतर घेतला वेगळा मार्ग
2014 साली गुरुदत्त यांच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. या धक्क्याने तो पूर्णपणे खचून गेला होता. मात्र दुःखात न राहता त्याने आईच्या आजारामागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्याला जाणवले. आईचा मृत्यू या कारणांमुळेच झाला असावा, अशी त्याची भावना झाली. त्यातूनच सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार त्याने केला.
advertisement
घरातून विरोध, पण निर्धार ठाम
गुरुदत्तने सेंद्रिय शेतीची कल्पना वडिलांसमोर मांडली, मात्र सुरुवातीला त्याला तीव्र विरोध सहन करावा लागला. “हे शक्य नाही”, “वेड लागलंय” अशा प्रतिक्रिया ऐकाव्या लागल्या. कुटुंबीयांचे सहकार्य नसतानाही त्याने आपला निर्णय बदलला नाही. गावातील तरुणांनाही त्याने या संकल्पनेत सहभागी करण्याचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला त्यांनाही या प्रयोगावर विश्वास नव्हता.
advertisement
2017 पासून सेंद्रिय शेतीची सुरुवात
अखेर 2017 साली त्याने सेंद्रिय शेतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली. भात लागवडीपासून त्याने प्रयोग सुरू केले. पहिल्याच वर्षी संपूर्ण हंगाम अपयशी ठरला. रासायनिक खतांची सवय झालेली जमीन सेंद्रिय पद्धतीशी जुळवून घेत नव्हती. उत्पादन घटले, आर्थिक अडचणी आल्या; तरीही त्याने हार मानली नाही. सलग तीन वर्षे संघर्ष करत त्याने जमिनीला सेंद्रिय पद्धतीशी जुळवून घेतले.
advertisement
परसबाग ते फळबाग, प्रयोगांना यश
आज गुरुदत्त जिरायत, रब्बी आणि बागायत शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करत आहे. घराशेजारील परसबागेत तो मेथी, पालक, लाल पोकळा, दोडका, काकडी, भोपळा, भेंडी, मिरची, टोमॅटो अशा भाज्या पिकवतो. तसेच आंबा, पेरू, फणस, कोकम यांसारखी फळझाडेही त्याने लावली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या बागांमधून उत्पादन मिळू लागले आहे. उत्पन्न कमी असले तरी शाश्वत आणि आरोग्यदायी शेती करत असल्याचा त्याला समाधान आहे.
advertisement
‘नेचर केअर टेकर’ संस्थेची स्थापना
फक्त स्वतःपुरती सेंद्रिय शेती करून उपयोग नाही, तर इतरांनीही या पद्धतीकडे वळावे, या हेतूने गुरुदत्तने गावातील तरुणांच्या मदतीने ‘नेचर केअर टेकर’ ही संस्था स्थापन केली. या माध्यमातून तो युवकांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देतो. त्याच्या प्रयत्नांमुळे सुरुवातीला विरोध करणारे तरुणही आता सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत.
advertisement
देश-विदेशातून शेतकऱ्यांच्या भेटी
गुरुदत्तच्या शेतीतील बदल पाहण्यासाठी राज्यासह देशातील विविध भागांतून शेतकरी भेट देत आहेत. मध्यप्रदेश, झारखंड, ओडिशा तसेच स्वित्झर्लंड आणि न्यूझीलंड येथील शेतकरी पथकांनीही त्याच्या शेतीला भेट दिली आहे. पाचगणी येथील ‘ग्रामपरी’ संस्था त्याला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत आहे. जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थीही ही शेती पाहण्यासाठी येतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 7:23 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
आईचं कॅन्सरने निधन तरी हार मानली नाही, साताऱ्याच्या गुरुदत्तची शेती पोहोचली परदेशात, करतोय लाखोंची कमाई






