सांगलीच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गाव. महाराष्ट्रातील इतर खेड्यांप्रमाणेच वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे हिंदू आणि मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहतात. 1980 मध्ये येथील झुंजार चौकात गणेशोत्सव साजरा होत होता. त्यावर्षी सर्वत्र मोठा पाऊस होता. पाऊस इतका वाढला की गणपतीसाठी तयार केलेला निवारा पावसाने खराब झाला. बाप्पाची मूर्ती पावसाने भिजणार होती पाऊस काही उघडीपच नाव घेत नव्हता. तेव्हा गावातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आले आणि सर्वानुमते निवाऱ्यासाठी गणपती मशिदीत नेण्याचा निर्णय झाला. नैसर्गिक संकटाला हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे तोंड देत गणेश उत्सवाचा सांस्कृतिक ठेवा जपला. त्या घटनेमुळे सन 1980 पासून गणेश उत्सव नेहमीच मशिदीतील गणपती म्हणून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा ठरला.
advertisement
मधल्या काळात अनेक संकटे आली. धार्मिक द्वेषाने राज्यांमध्ये कित्येकदा दंगली उसळल्या. मिरजेसारख्या ठिकाणी अनेकदा दंगे झाले. अलीकडच्या काळात ही वरचेवर बंधुता, सामाजिक सलोखा याला तिलांजली देणाऱ्या घटना घडतात. परंतु गोठखिंडीकरांनी या सामाजिक द्वेषाला, जातीय अन् धार्मिक भेदभाव करणाऱ्या विषाला कधीच थारा दिला नाही. गेल्या 45 वर्षांपासून तितक्याच उत्साहाने, एकोप्याने ही परंपरा गोटखिंडीतील दोन्ही धर्मीय बांधवांनी जोपासली आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आदर्श
गोटखिंडीकरांच्या न्यू गणेश मंडळामध्ये हिंदू-मुस्लिम समाजाचे शंभरहून अधिक सदस्य आहेत. दोन्ही धर्मीय एकत्र येऊन आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. गणेश उत्सवाच्या काळात मुस्लिम बांधवांचे ईद आले तर आम्ही गणपतीसह मुस्लिम धर्मातील ईदही तितक्याच उत्साहाने साजरे करतो. हिंदू- मुस्लिम एकतेचा आमच्या गावचा आदर्श संपूर्ण देशाने घेण्यासारखा आहे असे अशोक पाटील सांगतात.
ईद आणि गणपती एकत्र
1980 साली न्यू गणेश मंडळाची स्थापना झाली. यंदा 45 व्या वर्षी आम्ही मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू- मुस्लिम एकतेची परंपरा जपली आहे. आम्ही दोन्ही समाजातील लोक लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत एकत्र येत आनंदाने गणपती उत्सव साजरा करतोय. यंदा गणपतीच्या काळात ईदचा सण आहे. परंतु आमच्या गावातील मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थी नंतरच ईदला कुर्बानी देणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. नमाज पठण करून आणि हिंदू बांधवांकडून शुभेच्छा स्वीकारत ईद साजरा करतात असल्याची माहिती ॲड.अर्जुन कोकाटे यांनी दिली.
45 वर्षांपासूनची हिंदू- मुस्लिम एकत्रितपणे गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेवणार आहोत. मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून आम्ही मुस्लिम बांधव मंडळामध्ये आरती पूजेसह सर्वच कामांमध्ये गुंतलेलो असतो. मुस्लिम समाजासोबत हिंदू धर्मीयांचे सण आम्ही नेहमीच आनंदाने साजरे करतो, असे मंडळाचे माजी अध्यक्ष ईलाई पठाण यांनी सांगितले.
सर्वधर्म एकतेची शिकवण पुढल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गोटखिंडीकरांचा मशिदीतील गणपती आदर्श ठरतो आहे.