मुंबई : राज्यात सोयाबीनच्या दरात १६ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून आले. राज्यभरातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चांगले भाव मिळाले, तर काही ठिकाणी भाव अपेक्षेपेक्षा कमी राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि उत्सुकता दोन्ही वातावरण तयार झाले आहे.
advertisement
राज्यातील सरासरी सोयाबीन भाव साधारण ४,१९२ ते ४,३०० रु प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला. मात्र हा फक्त सरासरी भाव आहे. प्रत्यक्षात प्रत्येक बाजार समितीनुसार किमतींत मोठा फरक होता. काही ठिकाणी भाव ४,५०० पेक्षा जास्त, तर काही भागांत फक्त ३,७०० ते ३,८०० रु प्रति क्विंटल इतकेच भाव मिळाले.
सांगली जिल्ह्यातील तासगाव बाजार समितीत सोयाबीनला ४,६८० रु प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. हा दर राज्यातील अनेक बाजार समित्यांपेक्षा जास्त असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या भागात सोयाबीनचे उत्पादन तुलनेने चांगले असल्याने खरेदीदारांकडून मागणी वाढली आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला.
याउलट मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी दर कमी नोंदले गेले. काही बाजार समित्यांमध्ये भाव ३,७०० ते ४,१०० रु प्रति क्विंटल या दरम्यान राहिले. या भागात पावसामुळे आलेले नुकसान, दर्जेदार मालाची कमतरता आणि बाजारात आलेल्या मोठ्या पुरवठ्यामुळे दरात घसरण झाली.
विदर्भातील अकोला बाजार समितीत सोयाबीनचा दर ४,२६० रु प्रति क्विंटल नोंदवला गेला. वाशीम जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये भाव ४,१५० ते ४,२५० रु प्रति क्विंटल होते. हे दर सरासरीपेक्षा थोडे कमी असले तरी, मागील काही दिवसांच्या तुलनेत स्थिरतेकडे झुकत असल्याचे व्यापारी सांगतात.
दर कडाडणार का?
दरम्यान, राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. आधीच सोयाबीन लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. अशातच आता नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे दर कडाडण्याची शक्यता आहे.