मान्सूनची स्थिती
सध्या कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल व बांगलादेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीवर, तर पूर्व उत्तर प्रदेश परिसरात 1.5 किमी उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे हवामानातील अस्थिरता कायम आहे.
शनिवारी (2 ऑगस्ट) सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उर्वरित राज्यात मात्र सूर्यप्रकाश वाढला असून उष्माही जाणवतो आहे. यामुळे तापमानात वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी व चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
advertisement
येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांची यादी
पूर्व विदर्भात पावसाचा येलो अलर्ट लागू असलेले जिल्हे: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
इतर संभाव्य पावसाचे जिल्हे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस व विजांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
सध्या खरीप हंगाम सुरू असून, अनेक पिके अंकुरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पुढील गोष्टींची खबरदारी घ्यावी जसे की,
पाणी साचू देऊ नका - जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होईल याची खबरदारी घ्या.
खत व्यवस्थापन - ढगाळ हवामानात खतांचा वापर मर्यादित प्रमाणात करा. गरज असल्यासच फवारणी करा.
पीक संरक्षण - पावसासोबत येणाऱ्या रोगांपासून पिकांचे संरक्षण करा. कीडनाशक व बुरशीनाशकांची योग्य फवारणी वेळेवर करा.
विजांच्या काळात बाहेर जाणे टाळा - शेतीकाम करताना विजांच्या वेळेत उघड्यावर काम करणे टाळा.
