मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावात राहणाऱ्या इंद्रसेन गोरख मोटे यांच्याकडे बारा एकर शेती आहे. इंद्रसेन यांचे वडील गोरख मोटे यांना खिलार बैलांची आवड आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दोन खिलार बैल होते. खिलार बैलांचा नाद इंद्रसेन यांनाही लहानपणापासूनच लागला होता. त्यामुळे त्यांनी सातवीपर्यंत शाळा शिकली आणि शेती करण्यास सुरुवात केली. 2005 मध्ये घरच्या गाईच्या पोटी सोन्या बैलाचा जन्म झाला. तीन वर्षानंतर सोन्या बैल हाताला आला आणि 2010 मध्ये शेती कामात तो चांगला तयार झाला.
advertisement
Success Story: सोलापूरचा शेतकरी भारीच, 8 गुंठ्यात केली वांग्याची शेती, उत्पन्न मिळालं अडीच लाख!
शेतामध्ये काम करत असताना सोन्या बैलाच्या दोन्ही डोळ्यातून पाणी यायचं. तेव्हा इंद्रसेन यांनी गावातील पशुतज्ज्ञ डॉक्टर श्रीहरी शिंगारे यांना दाखवलं. डॉक्टरांनी डोळे तपासले आणि सांगितले की, तुमच्या सोन्या बैलाला दुर्धर आजार झाला असून त्याच्या डोळ्यात मांस वाढलेलं आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करून डोळे काढावे लागतील. हे ऐकल्यावर इंद्रसेन यांना धक्का बसला. पण त्यांनी सोन्याच्या प्रेमापोटी काहीही करा पण त्याला हा त्रास व्हायला नको, असे डॉक्टरांना सांगितले.
सुरुवातीला शस्त्रक्रिया करून सोन्या बैलाचा एक डोळा काढण्यात आला. कालांतराने हा आजार दुसऱ्या डोळ्यालाही झाला तेव्हाही शस्त्रक्रिया करून डोळा काढण्यात आला. तेव्हा गावकऱ्यांनी बैल विकून दुसरा बैल घेण्याचा सल्ला दिला. परंतु, इंद्रसेन यांनी बैलाला न विकता त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्या गाईचा हा बैल ते 18 वर्षांपासून सांभाळत आहेत.
दरम्यान, आज इंद्रसेन मोटेच नव्हे तर त्यांची पत्नी मनिषा मोटे, मुलगी सानिका, साक्षी व मुलगा शिवम यांनाही अंध बैल सोन्याचा लळा लागलेला असून घरच्या सदस्यासारखीच त्याची काळजी घेतात. नैसर्गिक रित्या त्याचं निधन झालं तरी शेतामध्येच त्याची समाधी करणार असल्याचं शेतकरी इंद्रसेन मोटे सांगतात.





