बीड : बीड जिल्ह्यातील गावंदरा येथील तरुण शेतकरी रामप्रभू बडे यांनी शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान आत्मसात करत पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर विचार केला. मागील तीन वर्षांपासून ते रेशीम शेती करत असून त्यांना या माध्यमातून दरवर्षी चांगला नफा मिळत आहेत. ऊस, कापूस, बाजरी आणि इतर पारंपरिक पिकांची लागवड करताना त्यांना लक्षात आले की या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक निर्बंध आहेत. सतत बदलणारे हवामान, मजुरीचा वाढता खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी नवा पर्याय शोधला आणि रेशीम शेतीकडे वळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
advertisement
रेशीम शेती हा भारतातील एक प्रगतशील शेतीचा प्रकार आहे, जो कमी जागेत अधिक नफा देऊ शकतो. रामप्रभू बडे यांनी सुरुवातीला याबाबत सखोल अभ्यास केला आणि त्यानंतरच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या दोन्ही शेती क्षेत्रांमध्ये रेशीम शेतीसाठी लागणाऱ्या तुतीच्या झाडांची लागवड केली. तुतीच्या पानांवर वाढणाऱ्या कोषांच्या रेशीम किड्यांच्या पालनाची सुरुवात त्यांनी काटेकोर नियोजनानुसार केली. नियमित व्यवस्थापन, योग्य तापमान नियंत्रण आणि अन्नपुरवठा यामुळे त्यांच्या रेशीम शेतीला लवकरच चांगले परिणाम दिसू लागले.
7 मिनिटांत एक एकर फवारणी, पुण्यातील 3 मित्रांची कमाल, बनवलं खास ड्रोन!
रेशीम उत्पादनाच्या पहिल्याच हंगामात त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. यानंतर त्यांनी याच शेतीत अधिक गुंतवणूक करत मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या रेशीम शेतीतून त्यांना दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. पारंपरिक शेतीपेक्षा हे उत्पन्न अनेक पटींनी जास्त असून शेतीचा खर्चही तुलनेने कमी असल्याचे ते सांगतात. विशेष म्हणजे कमी जागेत अधिक नफा मिळवण्याची संधी रेशीम शेतीत उपलब्ध आहे त्यामुळे भविष्यात अनेक शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे ते ठामपणे सांगतात.
रामप्रभू बडे यांच्या मते, शेतीमध्ये सातत्याने नवे प्रयोग करणे गरजेचे आहे. पारंपरिक शेतीतील तोटा पाहता शेतकऱ्यांनी पर्यायी शेती पद्धतीचा विचार केला पाहिजे. रेशीम शेतीसाठी सरकारकडून अनुदान आणि प्रशिक्षण मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी ही संधी साधून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा. नवीन तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग ठरू शकते.
आज रामप्रभू बडे केवळ स्वतःच आर्थिक प्रगती करत नाहीत तर इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीकडे आपला कल वळवला आहे. शाश्वत उत्पन्न आणि नफ्याची खात्री असल्याने भविष्यात रेशीम शेती अधिक प्रमाणात विस्तारली जाईल असे ते सांगतात. त्यांचा हा प्रवास तरुण शेतकऱ्यांसाठी नवी प्रेरणा देणारा आहे आणि आधुनिक शेतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला आहे.