यंदा 'आनंदाचा शिधा' नाही
राज्यातील अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत दरमहा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वितरण केले जाते. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ दिला जातो. तर प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतो. मागील तीन वर्षांपासून सण-उत्सवाच्या काळात शासनाकडून “आनंदाचा शिधा” म्हणून अतिरिक्त वस्तूंचे वाटप केले जात होते. मात्र, या वर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तो रद्द करण्यात आला आहे.
advertisement
त्याचबरोबर, पुरवठा विभागाने यंदा १९ जिल्ह्यांमध्ये गहू आणि ज्वारी समान प्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना आता २० किलो तांदूळ, साडेसात किलो गहू आणि साडेसात किलो ज्वारी मिळणार आहे. प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना एक युनिटसाठी एक किलो गहू, एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ असे प्रमाण ठरविण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत याचे वितरण सुरू आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ज्वारी मिळणार?
हिंगोली, बुलढाणा, अकोला, जळगाव, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर), लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.
स्थानिक पातळीवर काही जिल्ह्यांतून ज्वारीचा पुरवठा सुरू झाला आहे. अकोला, बुलढाणा आणि जळगाव येथे खरेदी झालेली ज्वारी अनुक्रमे हिंगोली, वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व नंदुरबार या जिल्ह्यांनी उचलली आहे. उर्वरित जिल्ह्यांनी स्थानिक खरेदी केंद्रांमधून पुरवठा घेतला आहे.
डिसेंबरपर्यंत वाटप सुरू राहणार
जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले की, २०२४-२५ या विपणन हंगामात राज्यात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी झाल्याने ती साठवणुकीत राहिली होती. त्यामुळे या अतिरिक्त साठ्याचा उपयोग सार्वजनिक वितरण व्यवस्थेत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हे वाटप होणार असून काही जिल्ह्यांत डिसेंबरपर्यंत ते सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.