जालना : खाजगी बाजारामध्ये कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याकडे वाढला आहे. यामुळे सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. कापसाचा साठा वाढल्याने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू असलेल्या सीसीआय खरेदी केंद्र 3 जानेवारी 2025 पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत सीसीआयने बाजार समितीला पत्र देऊन कळवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जालना बाजार समितीमध्ये सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीस आणू नये, असं आवाहन करण्यात आला आहे.
advertisement
जालना जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सीसीआय मार्फत कापसाला गुणवत्तेनुसार 7 हजार 100 ते 7 हजार 421 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. खाजगी बाजारातील दरांपेक्षा सीसीआयकडून मिळत असलेल्या दर अधिक असल्याने शेतकऱ्यांचा कल सीसीआय केंद्रावर कापूस विक्री करण्याकडे वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सीसीआय खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे.
हिवाळ्यात खिशाला कात्री, ड्रायफ्रूट्सच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, पण किंमती का वाढल्या?
जालना बाजार समिती येथे सुरू झालेल्या सीसीआय खरेदी केंद्रावर सुरुवातीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प होता. मात्र, खाजगी बाजारातील कापसाचे दर घसरतात. त्यामुळे शेतकरी सीसीआय केंद्रावर कापूस घेऊन येत आहेत. यामुळे अनिश्चित कालावधीसाठी जालना बाजार समितीतील सीसीआय खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीसीआय केंद्रावर कापसाची खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना कळविण्यात येईल. तो पर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस आणू नये, असं आवाहन बाजार समितीमार्फत करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने सीसीआय खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी जेणेकरून शेतकऱ्यांना कापूस सीसीआय केंद्रावर विक्री करताना अडचणी येणार नाहीत अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.






