अतिवृष्टीमुळे शेतीवर मोठा आघात
गतवर्षीच्या मुसळधार पावसाने आणि पूरस्थितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेतातील माती खरडून गेली, तर काही भागांत उभे पीक अक्षरशः वाहून गेले. खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर रब्बी हंगामात तरी काही उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी धरली होती. मात्र आर्थिक संकटामुळे बियाणे, खते आणि मशागतीसाठी निधी उभारणे कठीण झाले होते.
advertisement
राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय
ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि त्यांची शेती पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत करणे.
२७० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध
या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५५ हजार ४८७ शेतकऱ्यांसाठी २७० कोटी ९२ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी १५ जानेवारीअखेरीस २ लाख ७१ हजार २७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट १८७ कोटी ४३ लाख ८ हजार ७४३ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे.
