शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! शिक्षक भरतीच्या पवित्र प्रक्रियेत केले ४ मोठे बदल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Pavitra Portal : राज्यातील शाळांमधील शिक्षक पदभरती अधिक सोपी, पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने ‘पवित्र पोर्टल’वरील भरती प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत.
मुंबई : राज्यातील शाळांमधील शिक्षक पदभरती अधिक सोपी, पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने ‘पवित्र पोर्टल’वरील भरती प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. शिक्षक उमेदवारांना बराच काळ भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन चार मोठ्या सुधारणा करण्यात आल्या असून, यामुळे पदभरतीतील गोंधळ कमी होऊन प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार आहे.
नवीन बदल काय?
या सुधारित नियमांनुसार, चाचणी परीक्षेत मिळालेले गुण आता केवळ एकदाच निवडीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे वारंवार गुणांचा वापर करून होणाऱ्या गुंतागुंतीला आळा बसणार आहे. तसेच उमेदवारांना आता पदभरतीदरम्यान तब्बल ५० प्राधान्यक्रम देण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार शाळा, माध्यम किंवा पदासाठी अधिक पर्याय निवडता येणार आहेत.
advertisement
वयाची गणना कशी केली जाणार?
याशिवाय, उमेदवाराच्या वयाची गणना अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार केली जाणार आहे. यामुळे वयोमर्यादेबाबत निर्माण होणारे संभ्रम आणि तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सेमी-इंग्रजी माध्यमासाठी पात्रतेचा विस्तार करण्यात आला आहे. आता इंग्रजी किंवा विज्ञान विषयातील पदवीधारक उमेदवारांनाही सेमी-इंग्रजी माध्यमातील शिक्षक पदांसाठी पात्र मानले जाणार आहे.
advertisement
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून राबवली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेकडे असून, त्यासाठी स्वतंत्र सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. पवित्र पोर्टल संदर्भातील मूळ तरतुदी ऑक्टोबर २०२३ मध्ये जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, या नियमांमुळे अनेक ठिकाणी पदभरती प्रक्रिया क्लिष्ट होत असल्याच्या तक्रारी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत होती.
advertisement
काय फायदा होणार?
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षक संघटनांच्या मागण्यांचा विचार करून नव्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय अधिकृतपणे जारी करण्यात आला. विभागाच्या म्हणण्यानुसार, जुन्या काही तरतुदींमुळे पदभरती प्रक्रियेत अनावश्यक अडथळे आणि विलंब निर्माण होत होते. नव्या बदलांमुळे उमेदवारांना अधिक स्पष्टता मिळेल आणि भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
advertisement
शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, या सुधारित नियमांमुळे शिक्षक भरती अधिक सुलभ, पारदर्शक आणि न्याय्य होणार आहे. तसेच योग्य पात्र उमेदवारांना संधी मिळण्याचे प्रमाण वाढेल. नव्या निर्णयामुळे हजारो शिक्षक उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, येत्या काळात होणाऱ्या भरती प्रक्रियांमध्ये हे बदल तात्काळ लागू केले जाणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 9:00 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! शिक्षक भरतीच्या पवित्र प्रक्रियेत केले ४ मोठे बदल









