शिक्षणानंतर नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभा करायचा, असा निर्णय त्यांनी लवकरच घेतला. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी कॅफे व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. मात्र मुंबईतील दुकानांचे जास्त भाडे आणि खर्च लक्षात घेता त्यांनी सुरुवातीला हैदराबादची निवड केली. 2019 साली हैदराबादमध्ये ‘रँच कॅफे’ची सुरुवात झाली. वेगळ्या संकल्पनेमुळे आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे कॅफेला चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू हा ब्रँड वाढत गेला आणि आज हैदराबादमध्ये ‘रँच कॅफे’च्या एकूण दहा फ्रेंचायझी सुरू आहेत.
advertisement
हैदराबादमध्ये व्यवसाय स्थिर झाल्यानंतर पुन्हा आपल्या शहरात काहीतरी करायचं, या विचारातून अक्षय आणि निशील यांनी मुंबईत कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला. माटुंगा हा भाग साउथ इंडियन जेवणासाठी ओळखला जात असला, तरी वेगळ्या प्रकारचा कॅफे इथे चालू शकतो, यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि माटुंगा येथे ‘रँच कॅफे’ सुरू केला. या कॅफेची ओळख ही युनिक आणि हटके संकल्पनेसाठी आहे. येथे पदार्थांची सुरुवात 99 रुपयांपासून होते, त्यामुळे कॉलेज विद्यार्थी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने येथे येतो.
वेगळा स्वाद, साधी मांडणी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या किमती हे या कॅफेचे मुख्य आकर्षण ठरले आहे. सध्या माटुंगा येथील ‘रँच कॅफे’ चालवण्यासाठी महिन्याला सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत भांडवल आणि खर्च निघतो. योग्य नियोजन, कमी किमतीची संकल्पना आणि सतत ग्राहकांचा प्रतिसाद यामुळे हा व्यवसाय सुरळीत सुरू आहे. कमी वयात व्यवसाय सुरू करून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या दोन्ही मित्रांचा प्रवास अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.





