सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने मिनी महाबळेश्वर असा नावलौकिक निर्माण केला आहे. या ठिकाणी साधारण डिसेंबरपासून हुरडा पार्ट्यांचा हंगाम वेग घेऊ लागतो. ज्वारीच्या हिरव्यागार कणसांनी डोलणारी शेवारे, हुरड्यासाठी पेटविलेल्या आगत्या, त्यात भाजली जाणारी कोवळी कणसं, गरमागरम झाल्यानंतर हातावर चोळून तयार झालेला लुसलुशीत हुरडा खाण्यासाठी चिंचणी या गावात पर्यटकांची गर्दी होत आहे.
advertisement
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे कृषी पर्यटनातील वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. मोहन अनपट यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावच या व्यवसायात उतरले आहे. जेमतेम 65 कुटुंबे असलेल्या या गावात सर्व जण पर्यटकांच्या आदरातिथ्यासह सर्व कामात गुंतलेले असतात. हुरडा, भोजन आणि अस्सल ग्रामीण भागाची सैर पर्यटकांना इथे घडवून आणली जाते. तीन वर्षांत या गावाने 80 लाख रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. या हुरडा पार्टी आता कार्पोरेट स्तरावरही पोहोचल्या आहेत.
नोकरी मागून थकला, अखेर शेतीत केला प्रयोग, पहिल्याच वर्षी 3 लाखांचा नफा, असं काय केलं?
ज्वारीच्या हिरव्यागार कणसांनी डोलणारी शेवारे, हुरड्यासाठी पेटविलेल्या आगत्या, त्यात भाजली जाणारी कोवळी कणसं, गरमागरम झाल्यानंतर हातावर चोळून तयार झालेला लुसलुशीत हुरडा, जोडीला शेंगदाणा चटणी, फरसाण, गूळ, गोडी शेव, लसूण- तिळाची चटणी, रेवडी, वांग्याची भाजी, शेतातील गाजर, पेरू, बोर आदी गावरान मेवा या हुरडा सोबत खाण्यासाठी देतात.
कृषी पर्यटन केंद्र चिंचणी येथे प्रतिव्यक्ती 700 रुपयांपर्यंत पॅकेज स्वरूपात शुल्क असते. या व्यवसायातून गावातील महिला व पुरुष असे मिळून 50 ते 60 जणांच्या हातांना रोजगार मिळाला आहे. चिंचणी गावात हुरडा खाण्यासाठी सोलापूर जिल्हासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सांगली शहरामधून येथे अस्सल गावरान हुरडा खाण्यासाठी गर्दी असते.





